लसीकरण मोहिमेत आदर पुनावाला यांनीही घेतला सहभाग
![Adar Punawala also participated in the vaccination campaign](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/आदर.jpg)
पुणे | प्रतिनिधी
सीरम इन्स्टिट्यूटची कोविशील्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली जात आहे. कोविशील्ड लसची निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांनीही आज लस टोचून घेतली आणि या ऐतिहासिक मोहिमेत सहभागी झाले. लस घेतल्यानंतर कोणतेही दुष्परिणाम जाणवत नाही. हे अधोरेखित करण्यासाठी अदर पुनावाला यांनी लस टोचून घेतली. अदर पुनावाला यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशव्यापी कोरोना लसीकरण मोहिमेचा शुभारंभ केला. देशभरात आजपासून कोरोना लसीकरण सुरु झाले आहे.
ट्वीट मध्ये नमूद केले की, जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. कोविशील्ड या ऐतिहासिक प्रयत्नांचा भाग असल्याचा मला अभिमान आहे. या लसीची सुरक्षा आणि प्रभावाची जाणीव करुन देण्यासाठी मी स्वत: लस घेऊन आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत सहभागी झालो. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोविशील्ड लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिल्यानंतर केंद्र सरकारने या लसीच्या वितरणासाठी पहिली ऑर्डर दिली होती. सीरम इन्स्टिट्यूटकडून तब्बल एक कोटी दहा लाख इतके डोस पुरवण्यात आले आहे. एका डोसमागे दोनशे रुपये या दराने केंद्र सरकारने ही लस खरेदी केली आहे. सीरम इन्स्टिट्यूटमध्ये सध्या कोविशील्ड लसीचे पाच कोटी डोस तयार आहेत. परंतु हे पूर्ण पाच कोटी न पुरवता सध्या पहिल्या टप्प्यात फक्त एक कोटी दहा लाख डोस पुरवण्याचीच ऑर्डर केंद्र सरकारने दिली आहे.