रेल्वे बंद काळात एसटीच्या जादा गाड्या, पुणे स्टेशन, स्वारगेटहून नियोजन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/st-depot-nancy-colony-boriv-696x447.jpg)
पुणे – तांत्रिक आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी 9 ऑगस्टपर्यंत पुणे- मुंबई दरम्यान धावणाऱ्या काही रेल्वेगाड्या रद्द राहणार आहेत. या कालावधीत प्रवाशांचे हाल होऊ नये, यासाठी राज्य परिवहन (एसटी) तर्फे जादा गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
पुणे – मुंबई मार्गावरील लोणावळा ते कर्जत दरम्यान रेल्वे प्रशासनाकडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. यामुळे मुंबईला जाणाऱ्या सिंहगड, प्रगती या महत्वाच्या गाड्यांसह इतर काही गाड्या रद्द राहणार आहेत. पुण्यावरुन रोज मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. यात नोकरदार, विद्यार्थी यांची संख्या लक्षणीय असून रेल्वे बंदमुळे त्यांना पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे. यासाठी एसटी प्रशासनाकडून जादा गाड्या सोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. स्वारगेट, पुणे स्टेशन येथून दररोज 25 जादा गाड्या सोडण्यात येतील. तर, लोणावळ्यावरुनही काही गाड्या सोडण्यात येणार आहेत.
रेल्वे बंदच्या काळात प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे स्टेशन, स्वारगेट येथून 25 तर, लोणावळा येथून 10 जादा बसेस सोडण्यात येतील. प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यास यामध्ये वाढ करण्यात येईल
– यामिनी जोशी, विभाग नियंत्रक, पुणे