रुबेला लसीबाबत पालकांमध्ये संभ्रम

- मोहिमेंतर्गत लस देण्याचे बालरोगतज्ज्ञांचे आवाहन
गोवर-रुबेला या आजारांना रोखण्यासाठी केंद्र सरकारने हाती घेतलेल्या लसीकरण मोहिमेंतर्गत शाळांच्या माध्यमातून दिली जाणारी लस मुलांना द्यावी की नाही, असा संभ्रम पालकांमध्ये आहे. पालकांचा संभ्रम दूर करण्यासाठी शाळांकडूनही प्रबोधन केले जात असून, ही लस देणे बंधनकारक आणि आवश्यक असल्याचे बालरोगतज्ज्ञांनी तसेच महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत २७ नोव्हेंबरपासून शहरातील सर्व शाळांमध्ये ही मोहीम राबवण्यात येणार आहे. पुणे शहरात महानगरपालिकेच्या माध्यमातून ही मोहीम राबवली जाणार आहे. त्यासाठी स्थापन केलेल्या पथकामार्फत रोज दोनशे मुलांना ही लस दिली जाईल. त्यासंबंधीचे वेळापत्रकही तयार करण्यात आले आहे. मात्र, शाळेत राबवल्या जाणाऱ्या मोहिमेमध्ये मुलांना लस द्यावी की नाही असा संभ्रम पालकांमध्ये आहे. या पूर्वीच लस दिली असल्यास लस परत का द्यायची, लसीकरणामध्ये स्वच्छता पाळली जाणार का, असे अनेक प्रश्न पालकांकडून उपस्थित केले जात आहेत.
लसीकरणाविषयी शाळांकडून पालकांचे प्रबोधन करण्यात येत आहे. ‘पालकांसाठी प्रबोधन सत्र आयोजित करण्यात आले होते. त्यात पालकांनीही लसीकरणातील स्वच्छता, पुन्हा लस द्यावी का, लस दिल्याने काही दुष्परिणाम होतात का, असे प्रश्न विचारले. महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन लस देण्याचे आवाहन केले,’ अशी माहिती ज्ञानप्रबोधिनी प्रशालेच्या मुकुलिका थत्ते यांनी दिली. तसेच महानगरपालिकेकडूनही व्हॉट्सअॅप संदेश पाठवण्यात येत आहेत. ‘या पूर्वी कितीही वेळा लस दिलेली असली, तरी लसीकरण मोहिमेमध्ये लस देणे बंधनकारक आहे,’ असे महापालिकेचे लसीकरण मोहीम अधिकारी डॉ. अमित शहा यांनी सांगितले.





