राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी नवा चेहरा – अजित पवार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/04/IndiaTv0f586b_AjitPawar.jpg)
अजित पवार यांच्याकडे निवडीचे सर्वाधिकार
पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदाच्या निवडीचे सर्वाधिकार अजित पवार यांना देण्याचा ठराव पक्षाकडून करण्यात आला आहे. त्यानुसार पक्षाच्या शहराध्यक्षपदाची निवड २९ एप्रिलपर्यंत होण्याची शक्यता आहे. पवार यांनी यापूर्वी दिलेल्या संकेतांनुसार शहराध्यक्षपदी नवा तरुण चेहरा येण्याची शक्यता असल्याने या नावाबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा आणि खासदार अॅड. वंदना चव्हाण यांची राज्यसभेवर फेरनिवड करण्यात आली आहे. गेल्या आठ वर्षांपासून अॅड. वंदना चव्हाण यांच्याकडे शहराध्यक्षपदाची जबाबदारी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनानंतर आणि आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शहराध्यक्षपदी नव्याने निवड करण्यात येईल, अशी चर्चा सुरू झाली होती. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही शहराध्यक्षपदी तरुण चेहऱ्याची नियुक्ती करण्यात येईल, असे संकेत दिले होते. या पाश्र्वभूमीवर पक्षाच्या शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांच्या उपस्थितीत शहराध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष तसेच प्रदेश प्रतिनिधी यांची नावे निश्तिच करण्यासाठी पदाधिकाऱ्यांची बैठक निसर्ग मंगल कार्यालय येथे झाली. त्यामध्ये पवार यांना अधिकार देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.
शहराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार, नवीन चेहरा कोण असणार याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. सत्ताधारी भाजपने घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना होत असलेला त्रास लक्षात घेता भाजप विरोधात आंदोलन उभारू न पक्षाची भूमिका तळागाळापर्यंत पोहोचविणाऱ्या व्यक्तीला पक्षाने शहराध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्याची गरज आहे, अशी अपेक्षा या बैठकीत व्यक्त करण्यात आली.