मेट्रोच्या कामामूळे सेवारस्त्यावर वाहतूकीचा ताण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/04/car-parking01.jpg)
पिंपरी – पिंपरी ते दापोडीदरम्यान सुरू असणाऱ्या मेट्रोच्या कामामुळे या मार्गाच्या सेवारस्त्यावरील वाहतुकीचा ताण वाढला आहे. मेट्रोचे काम पूर्ण होईपर्यंत सेवा रस्त्यावर पूर्णतः नो पार्किंग लागू करण्याचा विचार वाहतूक पोलिस करत आहेत. याबाबत लवकरच रस्त्याची पाहणी करून त्यावर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
दापोडीजवळील सीएमइच्या चौकामध्ये सबवे आणि मेट्रो ही दोन्ही कामे सुरू आहेत. पिंपरीकडे जाणाऱ्या सेवारस्त्याच्या बाजूला वाहने उभी असतात. ग्रेडसेपरेटरमध्ये मेट्रोचे खांब उभे करण्याचे काम सुरू असल्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. सेवा रस्त्यावरील वाहतूक वाढली आहे. असे असताना दुचाकी, मोटारी उभ्या असतात. फुगेवाडी चौकात वाहतूक कोंडीचा प्रश्न सातत्याने जाणवत असतो. सेवा रस्त्यावर असणारा बसथांबा आणि उभी केलेली वाहने त्यामुळे इथल्या कोंडीत भर पडते. नाशिक फाट्याच्या चौकात खासगी लक्झरी बस थांबलेल्या असतात.