Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
माढा लोकसभेसाठी आजपासून उमेदवारी अर्ज स्विकारण्यास प्रारंभ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/Election-Commission-1.jpg)
सोलापूर – माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी गुरुवारपासून उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ४ एप्रिल आहे.
माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया तिस-या टप्प्यात होत आहे. माढा मतदारसंघासाठी अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अपर जिल्हाधिका-यांच्या कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी 3 या वेळेत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवारासह पाच लोकांना प्रवेश देण्यात येणार आहे. माढा लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. वंचित बहुजन आघाडीने अॅड. विजय मोरे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपच्या उमेदवाराबद्दल उत्सुकता आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी बुधवारी सायंकाळी माढा लोकसभा निवडणुकीच्या कामकाजाचा आढावा घेतला.
माढा लोकसभा मतदारसंघामध्ये करमाळा, सांगोला, माढा, माळशिरस या तालुक्यांसह पंढरपूर तालुक्यातील काही भागांचा समावेश आहे. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील फलटण, माण, खटाव आणि कोरेगाव तालुक्यातील उत्तर-पूर्व भागांचा समावेश आहे.
असा आहे माढ्याचा निवडणूक कार्यक्रम
- – उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख – ४ एप्रिल
- – उमेदवारी अर्जांची छाननी – ५ एप्रिल
- – उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख – ८ एप्रिल
- – मतदानाचा दिनांक – २३ एप्रिल