मराठा समाजाला सरसकट ओबीसी कोट्यातून आरक्षण द्या – ऍड. मनोज आखरे
![Give reservation to Maratha community from all OBC quota - Adv. Manoj aakhare](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/संभाजी-ब्रिगेड.jpg)
अन्यथा ठाकरे सरकार विरोधात ‘संभाजी ब्रिगेड’ महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरणार
पुणे | प्रतिनिधी
राज्य सरकार व विरोधी पक्ष मराठा समाजाची दिशाभूल करत आहेत. त्यांना आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावायचा नाही, म्हणून वेळ काढूपणा करत आहेत. परंतु यामध्ये मराठा समाजाची एक पिढी बरबाद होत आहे. भारतीय संविधान सर्वांना समान आहे. घटनात्मक चौकटीत सर्वांना आरक्षण मिळाले पाहिजे. म्हणून केंद्र सरकारने मागासवर्ग आयोगाच्या शिफारशी स्वीकाराव्यात. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ऍड. मनोज आखरे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत केली .
संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर, मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे, महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे, पुणे मध्ये जिल्हाध्यक्ष उत्तम कामठे, उत्तर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत पवार, शहराध्यक्ष अविनाश मोहिते, मोहिनी रणदिवे, जयदीप रणदिवे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
ऍड. मनोज आखरे म्हणाले की, मराठा समाजाला एसीबीसी (SEBC) प्रवर्गातून दिलेले आरक्षण कायद्याने टिकणार नाही. यामुळे समाजाचे नुकसानच होईल. हे संभाजी ब्रिगेडने वारंवार स्पष्ट केले आहे. कारण एसीबीसी आरक्षण फसवे आहे. त्यातून समाजाचा कायमस्वरूपी प्रश्न सुटणार नाही. राज्य सरकारने घटनात्मक पद्धतीने स्थापन केलेल्या मागासवर्ग आयोगाच्या समितीने मराठा समाजासाठी दिलेले आरक्षण घटनात्मक आहे. मराठा-कुणबी व कुणबी-मराठा एकच असून हा समाज सामाजिक आर्थिक दृष्ट्या मागास आहे. त्यामुळे मराठा समाजाचा सरसकट ओबीसी प्रवर्गात समावेश करून त्यांना आरक्षण मिळाले पाहिजे असे मागासवर्ग आयोगाने राज्य व केंद्र सरकारकडे अहवालाव्दारे कळवले आहे. मात्र राजकीय इच्छाशक्ती नसल्याने मराठा समाजाला आरक्षणापासून उपेक्षित ठेवले जात आहे. त्यामुळे नोकर भरती थांबली, प्रमोशन रखडले व विद्यार्थी महाविद्यालयीन व इतर प्रवेशापासून वंचित ठेवले गेले आहेत हा सत्ताधारी व विरोधक विरोधी पक्षाचा *’गेम प्लॅन’ आहे. आरक्षण देण्यात प्रस्थापित राजकीय नेत्यांची इच्छाशक्ती नाही हा संघर्षात्मक आंदोलन करणाऱ्या व आरक्षणासाठी स्वतःचा प्राण घेणार्या प्रत्येक आंदोलकाचा सरकारने ठरवून केलेला खुन आहे.
भारतात होणाऱ्या 2020-21 च्या राष्ट्रीय जनगणनेमध्ये ओबीसींची (OBC) सरसगट जातिनिहाय जनगणना झाली पाहिजे. अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे तसेच मराठा समाजाला सरसकट ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळाले पाहिजे अन्यथा यापुढे शांत न बसता संभाजी ब्रिगेड ठाकरे सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून संभाजी ब्रिगेड स्टाईलने आंदोलन करणार असल्याचा इशारा आखरे यांनी दिला.