बेकायदा वास्तव्य करणाऱ्या पाच नायजेरीयन नागरीकांना अटक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/crime-13.jpg)
पुणे |महाईन्यूज|
शिक्षण व पर्यटन व्हिसावर भारतामध्ये येऊन व्हिसाची मुदत संपूनही बेकायदा वास्तव्य करणाऱ्या पाच नायजेरीयन नागरीकांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. संबंधीतांना पोलिसांच्या परकीय नागरीक नोंदणी विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पुणे शहरात काही नायजेरीयन नागरीक शहरामध्ये बेकायदा वास्तव्य करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. या पार्श्वभुमीवर गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त अशोक मोराळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ.शिवाजी पवार, विजय चौधरी यांनी शहरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या नायजेरीयन नागरीकांवर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार, पोलिस निरीक्षक विजय टिकोळे व त्यांच्या पथकाने मंगळवारी कोंढवा परिसरातील उंड्री, पिसोळी परिसरात तपासणी केली. त्यावेळी स्काय हाईटस् इमारतीत नायजेरीयन नागरीक वास्तव्य करीत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकास मिळाली.
मंगळवारी दुपारी चार वाजता पोलिसांच्या पथकाने केहिंद केटरिना, नामायोम्बा, रिताह, टोनी ऍडजेमिओ, इक्वर जॉर्ज ओसारमेन, दाईक चिडीएमरे यांना स्काय हाईटस् इमारतीतील सदनिकेतून ताब्यात घेतले. सर्वजण मुळचे नायजेरीया येथील असून शिक्षण व पर्यटन व्हिसावर आले होते. मात्र त्यांचा व्हिसा संपल्यानंतरही ते बेकायदा शहरात वास्तव्य करत असल्याचे पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाले. त्यापैकी दाईक चिडीएमरे याच्याविरुद्ध दिल्लीमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी त्याचा पासपोर्ट दिल्ली न्यायायालच्या ताब्यात आहे. ताब्यात घेण्यात ओलल्या पाचजणांना पुणे पोलिसांच्या परकीय नागरिक नोंदणी विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.