बिल्डरकडून फसवणूक, ग्राहकांना मिळणार मोफत कायदेशीर सल्ला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/2-27.jpg)
पुणे |महाईन्यूज|
‘महरेरा’ अंतर्गत नोंदणी केलेल्या वकिलांनी ‘बिल्डर’कडून फसवणूक झालेल्या ग्राहकांना दिलासा दिला आहे. बिल्डरकडून फसवणूक झालेल्या ग्राहकांना येत्या १ फेब्रुवारीपासून मोफत कायदेशीर सल्ला देणे आणि त्यांचा खटला विनामोबदला लढवण्याचे वकिलांच्या संघटनेने जाहिर केले आहे. पहिल्या टप्प्यात मुंबईतील ग्राहकांना नि:शुल्क कायदेशीर मदत केली जाणार असून त्यानंतर राज्यातील इतर शहरांमध्ये हा उपक्रम राबवला जाईल.
वकिलांची संघटना असलेल्या बार असोसिएशनकडून ‘रेरा कायदा २०१६’ आणि ‘महारेरा’ कायद्याविषयी नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. कायदाचा धाक असूनही ‘बिल्डर’कडून फसवणूक झालेल्या ग्राहकांची संख्या वाढत आहे. यामुळे ‘महारेरा’मधील प्रलंबित खटल्यांची संख्या वाढली आहे. गृहनिर्माण क्षेत्रातील ही कोंडी फोडण्यासाठी बार असोसिएशनने पुढाकार घेतला आहे. बार असोसिएशनच्या मोफत कायदेशीर सल्ला विभागाकडून ग्राहकांना विनामोबदला कायदेशीर सल्ला दिला जाईल, असे बार असोसिएशनचे असोसिएशन सचिव अनिल डिसुझा यांनी सांगितले.
ज्यांना वकिलांची फी देणे परवडत नाही, अशा फसवणूक झालेल्या ग्राहकांना नि:शुल्क सल्ला दिला जाईल, प्रसंगी लवादामध्ये त्यांचा खटलादेखील लढला जाईल, असे डिसुझा यांनी सांगितले. या कामासाठी १५ ते २० वकिलांची निवड करण्यात आली आहे. त्यांची माहिती बार असोसिएशन स्वतंत्रपणे वेबसाइटवर प्रकाशित करेल किंवा ‘महारेरा’च्या वेबसाइटवर ती उपलब्ध होईल, अशी माहिती डिसुझा यांनी दिली.