फुटबॉल खेळताना खड्यात पडून दोन चिमुरड्यांचा मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/04/4b7de4b40a96dc7ddbb5cc472596ff89_XL.jpg)
पुणे- पुणे महापालिकेच्या शाळेच्या मैदानावर फुटबॉल खेळत असताना शाळेच्या आवारातच बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून दोन चिमुरड्यांचा दुर्दैवी अंत झाला. ही दुर्दैवी घटना रविवारी (29 एप्रिल) सायंकाळी येरवड्यातील लक्ष्मीनगर परिसरात घडली.
रुद्र दत्ता भूजबळ (वय-6) आणि रुद्र रुपेश चव्हाण (वय-8) अशी मृत्युमुखी पडलेल्या चिमुरड्यांची नावे आहेत. रात्री उशिरा या दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा परिसरातील लक्ष्मीनगर भागात महापालिकेची मातोश्री ही इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. रविवार असल्यामुळे शाळा बंद होती. तरीही फुटबॉल खेळण्यासाठी ते दोघे गेटच्या खालून शाळेच्या आवारात आले. फुटबॉल खेळताना बॉल खड्ड्यातील पाण्यात पडल्याने तो काढण्यासाठी गेले असताना ते पाण्यात बुडाले असण्याची शक्यता येरवडा पोलिसांनी व्यक्त केली.
दरम्यान, सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एका मुलाने मुले पाण्यात बुडाल्याचे नागरिकांना सांगितले. दरम्यान, पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी हजर झाले. तत्पूर्वी नागरिकांनी रुद्र भुजबळ याला पाण्याबाहेर काढले होते. तर रुद्र चव्हाण पाण्यात दिसत नव्हता. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण केले असता त्यांनी दीड तासांनी रुद्र चव्हाण याचा मृतदेह बाहेर काढला. दोघेही इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत होते. दोघा रुद्रच्या दुर्देवी मृत्युमुळे रामनगर परिसरता शोककळा पसरली होती.