फटाक्यांच्या दणदणाटात यंदा लक्षणीय घट
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/phatke.jpg)
- व्यवसाय ३० ते ४० टक्क्यांनी कमी
वातावरणातील बदलामुळे ऐन दिवाळीत पडलेला पाऊस, सर्वोच्च न्यायालयाने फटाके उडविण्याच्या निश्चित केलेल्या वेळा, एकूणच बाजारातील मंदी आणि शाळांमध्ये फटाकेमुक्त दिवाळीबाबत केले जाणारे प्रबोधन अशा कारणांमुळे यंदा पुण्यात फटाक्यांच्या दणदणाटात लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे फटाका विक्रीच्या कोटय़वधींच्या व्यवसायात यंदा ३० ते ४० टक्क्य़ांपर्यंत घट झाली आहे.
पुण्यात ऐन दिवाळीत पाऊस हजेरी लावत आहे. गेले तीन दिवस पाऊस सुरू आहे. दोन वर्षांपासून बाजारात मंदीसदृश वातावरण आहे. त्याबरोबरच फटाके विक्रीवरही बंधने आल्याने फटाके विक्रीचे स्टॉल यंदा कमी आहेत. मोठय़ा आवाजाचे आणि प्रदूषण करणारे फटाके वाजवणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळानेही तसे आदेश दिले आहेत.
या पाश्र्वभूमीवर पुणेकरांमध्ये यंदा फारसा उत्साह दिसून आला नाही. त्यामुळे फटाक्यांच्या दणदणाटातही यंदा लक्षणीय घट झाली आहे. दिवाळीत प्रत्येक वर्षी अभ्यंगस्नान झाल्यानंतर फटाके उडविण्याची प्रथा आहे. नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटेच सर्वत्र फटाक्यांचा दणदणाट आणि आतषबाजी सुरू होते. यंदा तसे चित्र पाहायला मिळाले नाही. सर्वसामान्य नागरिकांनी लहान मुलांच्या हौसेखातर मोजकेच फटाके विकत घेतले असे व्यापारी वर्गाकडून सांगण्यात आले. या पाश्र्वभूमीवर न खपलेल्या मालाचे पुढे काय करायचे हाही प्रश्न विक्रेत्यांना पडला आहे.
फटाके विक्रीमध्ये दणदणाटी आवाजाच्या फटाक्यांना मागणी कमी झाली आहे. याउलट भुईचक्र, भुईनळे आणि रॉकेटबाण अशा फॅन्सी फटाक्यांच्या खरेदीकडे कल वाढलेला दिसून येत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे यंदा व्यापाऱ्यांनी ३० ते ४० टक्के माल कमी भरला आहे, अशी माहिती मुकुंद भंडारी फटाका स्टॉलचे प्रशांत भंडारी यांनी दिली. दिवाळीमध्ये पाऊस पडत असला तरी त्याचा फटाक्यांवर कोणताही परिणाम झालेला नाही. एक तर फटाके व्यवस्थित सिलबंद असतात आणि आम्ही ताडपत्रीमध्ये सुरक्षित ठिकाणी फटाके ठेवतो. त्यामुळे फटाके सादळण्याचा किंवा फुसका बार निघण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही त्यांनी सांगितले.
शहर तसेच उपनगरांमधील शाळांमध्ये दिवाळी सुट्टीच्या आधी फटाके विकत घेऊन उडवण्यापेक्षा तेच पैसे सामाजिक संस्थांना देण्याबाबत, तसेच प्रदूषण आणि फटाक्यांमुळे होणारे आजार यांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येते. त्याचाही परिणाम दरवर्षी होत असल्याचे निरीक्षण फटाके विक्रेते मंजुनाथ बिराजदार यांनी नोंदवले. यंदा शहरात वाहतूक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या सूचनेनुसार एकोणीस ठिकाणी फटाका स्टॉलना परवानगी देण्यात आली आहे. त्यामध्ये हडपसर, कोंढवा, खराडी, वानवडी, कात्रज, नदीपात्र, लोहगाव, नगर रस्ता, गंगाधाम चौक, कोथरूड, सहकारनगर, धायरी, राजाराम पूल परिसर या ठिकाणांचा समावेश आहे.
फटाके विक्री का घटली
- फटाक्यांच्या दुष्परिणामांबाबत शाळांमध्ये होणारे प्रबोधन
- रोज सुरू असलेला पाऊस
- बाजारातील मंदीसदृश वातावरण
- न्यायालयाच्या आदेशाचा परिणाम
सर्वसामान्य नागरिकांमध्ये फटाक्यांबाबत जागरूकता वाढली आहे. फटाके फुसके निघणे, अपघात अशा कारणांमुळे हलक्या दर्जाचे फटाके घेण्यापेक्षा ब्रॅण्डेड फटाके घेण्याकडे लोकांचा कल दिसून येत आहे. मात्र विविध कारणांमुळे गेल्या वर्षीपेक्षा फटाके विक्रीमध्ये यंदा ३० टक्क्य़ांनी घट झाली आहे. – मनोज कुलकर्णी, अध्यक्ष, फटाका असोसिएशन