पौडमधील वन क्षेत्रपाल कार्यालयात बॉम्बस्फोट
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/paund-pune_201906247586.jpg)
पुणे – पौड येथील वन क्षेत्रपाल कार्यालयात जप्त करुन ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट होऊन कार्यालयाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सुदैवाने कार्यालयात कोणीही नसल्याने जीवितहानी झालेली नाही. ही घटना पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-कोलाड महामार्गालगत असलेल्या ताम्हिणी अभयारण्यात डुक्कर मारण्यासाठी बॉम्ब पेरण्यात आले होते. खाद्य समजून डुक्करांनी ते खाण्याचा प्रयत्न केला तर त्याचा स्फोट होतो व त्यात डुक्कर मरतात. अभयारण्यात लावलेले हे ७० ते ८० बॉम्ब वन विभागाने जप्त केले. पौड येथील एका इमारतीत वन विभागाचे कार्यालय आहे. पहिल्या मजल्यावरील या वनक्षेत्रपाल कार्यालयात हे बॉम्ब ठेवले होते. या ठिकाणी दररोज दोन कर्मचारी रात्री असतात. मंगळवारी रात्री ते कार्यालयात झोपले नव्हते. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास या बॉम्बचा स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की, त्यात पहिल्या मजल्यावरील खिडक्या, दरवाजे तुटले. या घटनेची माहिती मिळताच पौड पोलीस तसेच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत.