पुण्यात ३१ जुलैपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ६० हजार होईल

पुणे – जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन अहोरात्र मेहनत घेत आहे. दहा दिवसांचा लॉकडाऊनही केला. तरीही पुण्यातील रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही. ३१ जुलै रोजी तर पुण्यात बाधित रुग्णांचा आकडा ६० हजारावर जाईल. तर २७ हजार अॅक्टिव रुग्ण असतील. तसेच २० ते २५ ऑगस्ट दरम्यान साधारण एक लाख कोरोनाबाधित रुग्ण असतील. यावेळी ॲक्टिव रुग्ण संख्या ४८ हजार असणार आहेत. पुणे शहरात जिल्ह्यातील ३० टक्के रुग्ण संख्या आहे. त्यामुळे या रुग्णांसाठीसुद्धा बेडव्यवस्था करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती पालिका अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
यावेळी बोलताना रुबल अग्रवाल यांनी शहरातील कोरोना आणि उपाय योजनांची माहिती दिली. रुग्णांची माहिती वेळेवर न देणाऱ्या आणि निष्काळजीपणा करणाऱ्या २५ रुग्णालयांवर यापूर्वी कारवाई केली आहे. तर नुकतीच १० रुग्णालयांना नोटीस बजावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तर असिमटमॅटिक लक्षणे असलेल्या रुग्णांना घरी राहण्याचे आवाहन त्यांनी केले. त्याचबरोबर माहिती अपडेट करण्यासाठी नवीन सॉफ्टवेअर तयार करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
तर विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी कोरोनाचा आढावा घेत प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती दिली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जम्बो रुग्णालय उभारण्यात येत आहे. लॉकडाऊन काळात रोज ११ हजार ४११ नमुने घेतले आहेत. तर मृत्यूदर २७४ वरुन २३८ वर घसरला आहे.





