पुण्यात लॉकडाऊन वाढवलं, तर आम्ही आत्मदहन करू, व्यापारी वर्गाचा इशारा
पुणे |महाईन्यूज|
अनलॉकच्या प्रक्रियेनंतर पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी तातडीने बैठक घेत पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन शहरांमध्ये लॉकडाऊनची घोषणा केली. 13 जुलै ते 23 जुलै या दरम्यान होत असलेल्या या लॉकडाऊनच्या परिस्थितीवर पुणे व्यापारी संघाने तीव्र इशारा दिली आहे. 23 जुलैनंतर जर लॉकडाऊन वाढवला तर व्यापारी आत्मदहन करतील असा इशारा व्यापारी महासंघ अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी दिला आहे.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरू आहे. पण तरीदेखील लॉकडाऊनच्या काळात कोरोना रुग्ण हजारोच्या संख्येने वाढले. या सगळ्यात मात्र व्यापार उध्वस्त होत चालला आहे. सरकारने व्यापाऱ्यांना काहीही मदत केलेली नाही. त्यामुळे आता जर लॉकडाऊन वाढवला तर काही व्यापारी आत्महत्या करतील असा इशारा पुणे मर्चंट चेंबरनंसुद्धा दिला आहे. कोरोनामुळे राज्यात सतत लॉकडाऊन वाढत आहे. सगळे व्यवहार, व्यापार बंद असल्यामुळे मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे आता जर लॉकडाऊन वाढलं तर थेट उपोषण आणि आंदोलनाचा इशारा व्यापारी वर्गाकडून देण्यात येत आहे.





