पुण्यात लॉकडाऊनचे नियम शिथिल, उद्यापासून दुकानं राहणार खुली
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/pune-market-yard.jpg)
पुणे | महाईन्यूज | प्रतिनिधी
पुण्यामध्ये 13 ते 18 जुलै दरम्यान जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यानंतर नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पुणेकरांना दिलासा दिला आहे. जीवनाश्यक वस्तू खरेदीसाठी उद्याच्या रविवारी (दि. 19) सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंत दुकानं खुली राहणार आहेत. तर, सोमवारपासून दुकानांना सकाळी 8 ते दुपारी 12 पर्यंतची वेळ दिली आहे. तर, दुसरीकडे 23 जुलैपर्यंत दारु दुकानं बंदच राहणार आहेत.
दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या दिवशी दुकानांसमोर गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत मनपा प्रशासन आणि पोलीस प्रशासनात विचारविनीमय सुरु होता. त्यानंतर ही शिथिलता देण्यात आली. नियमांचे पालन करुन हळूहळू शिथिलता देण्यात येईल, असं आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितलं.
लॉकडाऊन काळात याठिकाणी पूर्ण बंदी
पुण्यात लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर 14 ते 18 जुलैपर्यंत सर्व किराणा दुकानं पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहेत. त्यानंतर 19 ते 23 जुलैपर्यंत सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेची दुकानं सुरु राहणार आहेत. 13 ते 23 जुलै या दहा दिवसात सर्व उद्याने आणि क्रीडांगणे बंद राहणार आहेत. याशिवाय सरकारच्या वंदे भारत योजनेअंतर्गत येणारे उपहारगृह, बार, लाँज आणि हॉटेल वगळता सर्व रिसॉर्ट, मॉल, बाजार, मार्केट पूर्णपणे बंद राहणार आहेत.