पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा महापालिकेवर मोर्चा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/1-5.jpg)
पुणे – महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या अकरा गावांना मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्या, तसेच विकासकामांसाठी अंदाजपत्रकात तरतूद करावी, यासह विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला.
बालगंधर्व रंगमंदिर चौक ते महापालिका या दरम्यान काढण्यात आलेल्या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रीया सुळे, शहराध्यक्ष चेतन तुपे, राष्ट्रवादी महिला कॉग्रेसच्या शहराध्यक्षा रुपाली चाकणकर, पालिकेतील गटनेते दिलीप बराटे, युवकचे अध्यक्ष राकेश कामटे, माजी आमदार बापू पठारे यांच्यासह पक्षाचे नगरसेवक, कार्यकर्ते आणि समाविष्ट गावातील नागरिक सहभागी झाले होते.
पुणे महापालिका हद्द वाढ झाल्यानंतर अकरा गावांचा समावेश करण्यात आला होता. या गावांतून महापालिका प्रशासनाने विविध करांपोटी कोट्यवधी रुपये जमा करून घेतले आहेत. मात्र, गावांतील पाणी, कचरा, वीज, पथदिवे, आरोग्य, सांडपाणी व्यवस्थापनाचे प्रश्न कायम आहेत. लोहगावमध्ये दहा दिवसांतून एकदा पाणी पुरवठा होत आहे. या प्रश्नांबाबत महापालिकेच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदन देण्यात आले आहे. बैठकाही घेण्यात आल्या आहेत. मात्र, गावांमधील विकासकामांवर निधी खर्च झालेला नाही. त्यामुळे ही गावे केवळ करवसुलीसाठी समाविष्ट करून घेतली का? असा सवाल यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी उपस्थित केला. या गावांमध्ये मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्या, तसेच विकासकामांसाठी पालिकेच्या आगामी अंदाजपत्रकात तरतूद करण्यात यावी, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.