पुण्यातील मदरशातून सहा मुले बेपत्ता
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/crime_1482259366.jpeg)
पुणे – हडपसर परिसरातील मदरशातून सहा मुले बेपत्ता झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ही मुले मैदानावर खेळत असताना शौचालयात जाण्याच्या बहाण्याने मदरशातून बाहेर पडली होती. मात्र, ती अद्याप मदरशात किंवा घरी परतली नाहीत. तीन जुलैपासून हे सर्व बेपत्ता आहेत.
सहमद आसार उद्दीन रजा (वय १३), अन्ना महंमद आजाद शेख (वय १२), अहसान निजाम शेख (वय १५), शाहनवाज जमालुउद्दीन शेख (वय १६), अन्वारुल इसराइल हक (वय १३) आणि रिजवान आलग सलमुद्दीन शेख (वय १५) अशी बेपत्ता झालेल्या मुलांची नावे आहेत. याप्रकरणी मोहम्मद अबु तालीब शब्बीर आलम शेख (वय २६) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सय्यदनगर येथील दारुल उलूम चिस्तीया जलालिया नावाच्या मदरशामध्ये ही मुले दाखल झाली होते. फिर्यादींंनी मदरशात आधीपासून असलेल्या तीन मुलांसोबत त्यांना ३ जुलै रोजी सायंकाळी जवळच्या मैदानात खेळायला नेले होते. टप्प्या-टप्याने ही सर्व मुले शौचालयात जायचे असल्याचे सांगून बाहेर पडली. यानंतर ती मदरशामध्ये गेली, तेथून स्वत:चे सामान घेऊन कोणालाही काही न सांगता निघुन गेली आहेत. यानंतर ती मदरशात तसेच घरी परत आली नाहीत. त्यांच्या कुटूंबीयांनी सर्वत्र शोधाशोध केल्यानतर प्रत्येक कुटुंबाने वानवडी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. एकाच ठिकाणाहून सहा मुले बेपत्ता झाल्याचे समजताच पोलिसांनीही त्यांचा कसून शोध घेत आहेत. तर मुले घरी न परतल्याने त्यांच्या नातेवाईकांनी टाहो फोडला आहे. बेपत्ता झालेल्या मुलांनी कोणीतरी आमिष दाखवत पळवून नेल्याची शक्यता आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक एस. आर. शिंदे तपास करत आहेत.