पुण्यातील कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी शरद पवार मैदानात!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/FB_IMG_1599309349885.jpg)
पुणे | प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजना इत्यादी विषयांच्या अनुषंगाने आज पुण्यात प्रशासकीय व वैद्यकीय अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींशी चर्चा करून आढावा घेतला. तसेच महत्त्वपूर्ण बाबींवर चर्चा केली व अडचणी, समस्या जाणून घेतल्या, अशी माहिती राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिली.
पवार म्हणाले की, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोरोनाचा वेगाने फैलाव होण्याची कारणे, याबाबतचे माझे निरीक्षण, त्याचबरोबर कोरोनाबधितांचा आकडा नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने कोणत्या उपाययोजना राबवण्याची गरज आहे, इत्यादी बाबींबाबत सूचना केल्या.
पिंपरी आणि शिवाजीनगर याठिकाणी २५ टक्के नागरिक मास्कचा वापर करत नसल्याचे मला आढळून आले. कोरोनाच्या चाचण्या मोठ्या प्रमाणावर वाढवण्याची आवश्यकता आहे, याकडे लक्ष वेधले.
कोरोनाबधितांचा वाढता आकडा पाहता नवीन बांधकामे किंवा इमारतींमध्ये विलगीकरणाची सुविधा उपलब्ध करून द्यायला हवी. ऑक्सिजनसह विविध सोयी-सुविधांनी सुसज्ज अशी रुग्णवाहिका वेळेवर आणि आवश्यकता भासल्यास तातडीने उपलब्ध करून देण्याची सुविधा द्यावी.
त्याचबरोबर आरक्षित सरकारी मालमत्तांचा वापरही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विलगिकरण तसेच इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व्हावा अशा सूचनाही यावेळी केल्या.
पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात राहावी, तसेच एकाही नागरिकाचा कोरोनाने मृत्यू होऊ नये या दृष्टिकोनातून उपाययोजना राबवण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे.
बैठकीला केंद्रीय मंत्री श्री. प्रकाश जावडेकर, राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार, सार्वजनिक आरोग्यमंत्री श्री. राजेश टोपे, स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.