पुणे महापालिकेकडून ‘या’ आठ ठिकाणी संचारबंदी लागण्याची शक्यता
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/coronavirus.jpg)
पुणे |महाईन्यूज|
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शहरात आठ ठिकाणी संचारबंदी लागू करण्याचा प्रस्ताव पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांना पाठविला. या प्रस्तावात पुणे महापालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालयांच्या परिसराचाही समावेश आहे. परिणामी, पुण्यात 22 ठिकाणी अप्रत्यक्षपणे संचारबंदी लागू होण्याची शक्यता आहे.
प्रस्तावामध्ये संचारबंदीच्या कालावधीचा उल्लेख नाही. त्यावर महापालिका, पोलिस प्रशासन आणि जिल्हाधिकारी संयुक्त निर्णय घेतील, असे समजते. महापालिका क्षेत्रीय कार्यालयांसह 19 ठिकाणी शंभर मीटर परिसरात, एका ठिकाणी दोनशे मीटर परिसरात तर दोन ठिकाणी पाचशे मीटर परिसरात संचारबंदी लागू करण्याचा प्रस्ताव आहे. या माहितीला गायकवाड आणि नवलकिशोर राम यांनी दुजोरा दिला. या प्रस्तावावर अभ्यास करून आज (सोमवारी) निर्णय घेणार असल्याचे वेंकटेशम यांनी सांगितले.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी पुणे महापालिकेच्या क्षेत्रात आपत्कालीन उपयोजना लागू करण्याची व त्यावर प्रतिबंधात्मक उपयोजना आखण्याची आवश्यकता प्रशासनाला वाटते आहे. शासकीय, निमशासकीय व खासगी या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरिक एकत्र येण्यामुळे आरोग्याला व जीविताला धोका निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे शहरात विविध ठिकाणी फौजदारी कायद्यातील तरतुदीनुसार संचारबंदी (कलम 144) लागू करण्यात यावी, असे गायकवाड यांनी प्रस्तावात म्हटले आहे. या प्रस्तावाला जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्त यांनी मान्यता दिल्यानंतर ही संचारबंदी लागू होणार आहे.
ही आहेत संचार बंदी लागू होणारी ठिकाणे
डाॅ. नायडू हाॅस्पीटल आणि परिसर, सारसबाग सणस स्पोर्टस काॅम्प्लेक्स, सिंहगड रस्त्यावरील डाॅ. लायगुडे हाॅस्पीटल परिसर, पुणे महापालिकेची मुख्य इमारत, महापालिकेचे सर्व क्षेत्रीय कार्यालये, हडपसर औद्योगिक वसाहत, फुरसुंगी आणि उरळी देवाची