पावणे अकरा लाखाच्या मेफेड्राॅनसह 16 लाखाचा मुद्देमाल जप्त
![Doctors demand bribe for treatment from Mahatma Phule Janaarogya Yojana](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/crime-1.jpg)
पुणे – कारमधुन विक्रीसाठी घेऊन जात असलेले तब्बल 212 ग्रॅम वजनाचे व पावणे अकरा लाख रूपये किंमतीचे मेफेड्राॅन या अंमली पदार्थासह 16 लाख रूपयांचा मुद्देमाल गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केला. रविवारी मध्यरात्री झालेल्या या कारवाईत पोलिसांनी दोघाना अटक केली आहे.
विसारत अली सना उल्ला (वय 32, स्वप्नाली बिल्डींग, के.के.मार्केटजवळ, बालाजीनगर, धनकवडी, मुळ रा.पाचगाची, बिहार) व ब्रिजेश उपेंद्र शर्मा (वय 38, रा. दिनांक बंदर, रायचूर इस्टेट,डोंगरी,मुंबई) अशी अटक केलेल्या संशयित आरोपीची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकातील (पुर्व) सहायक पोलिस निरीक्षक रायकर, पोलिस कर्मचारी जोशी, बोमादंडी, साळुंखे, शिंदे, दळवी, गायकवाड,जाचक,शिरोळकर आणि व मोहिते यांचे पथक भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते.
त्यावेळी कात्रज चौकातील जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या इमारतीसमोर पुणे मुंबई बाह्यवळण रस्त्याच्या बाजूला एक स्विफ्ट कार (एमएच 12 एनएक्स 4950 ) मधील दोन तरुण संशयास्पदरीत्या हालचाल करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी दोघाना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्यासह कारची तपासणी केली, त्यावेळी त्यांच्याकडुन पावणे आकरा लाख रुपये किंमतीचे 212 ग्रॅम 650 मिलिग्रॅम वजनाचे मेफेड्राॅन, पाच लाख रूपयांची स्विफ्ट कार, दोन मोबाईल व एक हजार रूपये रोख असा 16 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात एनडीपीएस कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
“आतापर्यंत मेफेड्राॅन या अंमली पदार्थविरुद्ध करण्यात आलेली ही पाचवी मोठी कारवाई आहे. यापुढेही मेफेड्राॅनसह अन्य अंमली पदार्थ विरोधीची कारवाई करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.” असे पोलिस उपायुक्त (गुन्हे) बच्चन सिंह यांनी स्पष्ट केले.