पालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपच्या ममता गायकवाड यांची निवड निश्चित
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/03/mamata.jpg)
पिंपरी: श्रीमंत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आर्थिक चाव्या ममता गायकवाड यांच्या हाती असणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपकडून त्यांचा अर्ज भरण्यात आला आहे. स्थायीत भाजपचे बहुमत असल्यामुळे त्यांची निवड निश्चित मानली जात आहे. त्यांच्या नावावर सात मार्चला शिक्कामोर्तब होईल. पिंपरी-चिंचवड महापालिका तिजोरीच्या चाव्या आपल्या समर्थकाच्या हाती घेण्यासाठी भाजप नेत्यांच्या जोरदार हालचाली सुरु होत्या. त्यामुळे कोणत्या विधानसभा मतदारसंघाकडे स्थायीचे अध्यक्षपद जाणार याकडे राजकीय वर्तुळासह शहराचे लक्ष लागले होते. या सर्व हालचालींना आणि चर्चेला पूर्णविराम मिळाला. स्थायीचे अध्यक्षपद चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पारड्यात पडले आहे.
ममता गायकवाड या राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांच्या पत्नी आहेत, गायकवाड हे आमदार लक्ष्मण जगताप यांचे समर्थक आहेत. निवडणुकीच्या आधी त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला होता. गायकवाड यांच्या निवडीमुळे स्थायी समितीपद यावेळी देखील आमदार जगताप यांच्या समर्थकाकडे आले आहे
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी आज (शनिवारी) तीन ते पाच या वेळेत अर्ज भरायचे होते. भाजपकडून ममता गायकवाड यांचा अर्ज भरण्यात आला आहे. भाजपचे प्राबल्य आहे. त्यामुळे त्यांची निवड निश्चित मानली जात आहे. स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक सात मार्च रोजी दुपारी बारा वाजता होणार आहे.