पाण्याचा प्रवाह वाढला अन् आजी आणि नातू दोघंही वाहून गेले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/khed-239077_202010509380.jpg)
पुणे |महाईन्यूज|
पुण्यातील खेड तालुक्यात गुरुवारी संध्याकाळी जोरदार पाऊस झाला. यावेळी बाहेर असलेला आजी आणि नातवानं या पावसापासून वाचण्यासाठी एका छोट्या पुलाचा आश्रय घेतला आणि घात झाला. या पुलाखाली असलेल्या मोरीमधून जोरदार पावसामुळे पाण्याचा प्रवाह वाढला आणि आजी आणि नातू दोघंही वाहून गेले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार दोघेही चासकमान धरणात वाहून गेले असून कहू कोयाळी रस्त्यावर काल संध्याकाळच्या या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. नातवाचा मृतदेह आज सकाळी सापडल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे परिसरात शोकाकूल वातावरण आहे.
आदिवासी भागातल्या चासकमान जलाशय परिसरात गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह परतीच्या पावसानं झोडपून काढलं. यावेळी चासकमान जलाशय परिसरातील ओढे नाले दुथडी भरुन वाहत असताना कहू कोयाळी इथून ओढ्याच्या नाल्यातून वद्ध महिलेसह 4 वर्षांचा चिमुकला पाण्यात वाहून गेला.
भोराबाई पारधी असं या वृद्ध महिलेचं नाव आहे. आपल्या नातवासह त्या शेतात काम करत होत्या. त्याचवेळी जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस आल्यानं त्यांनी पुलाखाली आश्रय घेतला होता. मात्र मुसळधार पावसामुळे पाणी वाढलं आणि पुलाखाली पाण्याचा प्रवाह वाढला त्यामध्ये आजी आणि नातू वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तहसिलदार सुचित्रा आमले,प्रांतधिकारी विक्रांत चव्हाण आपत्ती व्यवस्थापन टिम सोबत काल सायंकाळी घटनास्थळी पहाणी केली.स्थानिक नागरिकांकडून शोध सुरु असताना आज सकाळी नातवाचा मृतदेह सापडला आहे