पती-पत्नीला मंदिरात फेऱ्या मारण्यास सांगून पळविले दागिने
![Unnatural atrocities on an eleven-year-old boy in Alandi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/crime-2.jpg)
पुणे : पती-पत्नीमधील भांडणे थांबावीत म्हणून दाम्पत्यास मंदिराला प्रदक्षिणा मारण्यास सांगितले. त्यानंतर त्यांच्याकडील दागिन्याची पूजा करण्याच्या बहाण्याने घेऊन पळ काढला. ही घटना सारसबाग परिसरामध्ये एप्रिल महिन्यात घडली. याप्रकरणी शनिवारी रात्री विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी, सदाशिव पेठेतील एका नागरिकाने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन एका अनोळखी व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक बापु रायकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांच्या पत्नीमध्ये सातत्याने भांडणे सुरु होती. दरम्यान संबंधित दाम्पत्य एका मठामध्ये दर्शनासाठी जात होते. त्याठिकाणी एका व्यक्तीशी त्यांची ओळख झाली. संबंधित व्यक्तीला दाम्पत्यने कौटुंबिक भांडणाची समस्या सांगितली. पती-पत्नीमध्ये भांडणे होऊ नयेत, म्हणून ओळख झालेल्या व्यक्तिने त्यांच्याकडील दागिन्याची पूजा करण्यास सांगितले. त्यानुसार दाम्पत्य त्यांच्याकडील दागिने घेऊन सारसबागेजवलील एका मंदिरामध्ये बोलावले. त्यानंतर त्यांना मंदिराला फेऱ्य़ा मारण्यास सांगुन पूजा करण्यासाठी दागिने त्याच्याकडे ठेवले. दाम्पत्य फेऱ्या मारत असल्याचे पाहुन संबंधित व्यक्ति दागिने घेऊन पसार झाला.