‘नो बॉल’चा निर्णय दिल्याने बाॅलर चिडला; अंपायरला केली बेदम मारहाण
!['नो बॉल'चा निर्णय दिल्याने बाॅलर चिडला; अंपायरला केली बेदम मारहाण](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/cricket.jpg)
पुणे |महाईन्यूज|
क्रिकेटच्या मैदानातच हाणामारी झाल्याची घटना रविवारी दुपारी पुण्यातील तळेगाव दाभाडे येथील डाळ आळीत घडली. पंचांनी नो बॉलचा निर्णय दिल्याने चिडलेल्या गोलंदाजाने पंचांनाच बेदम मारहाण केली. तसेच याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या त्याच्या आईलाही तिघांनी मिळून मारहाण केली. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तळेगाव दाभाळे येथील डाळ आळीत काल, रविवारी दुपारी काही मुले क्रिकेट खेळत होती. त्याचवेळी निशांत हा पंच म्हणून काम पाहत होता. तर श्रवण हा गोलंदाजी करत होता. त्याने टाकलेला चेंडू पंत असलेल्या निशांतने नो बॉल दिला. त्यावर गोलंदाजाने पंचाला शिवीगाळ केली. त्यानंतर त्याच्या पायावर दगड मारला. दगड जोरात लागल्याने यात तो जखमी झाला. त्याने याबाबत आपल्या आईला सांगितले. तो आणि त्याची आई श्रवणला जाब विचारण्यासाठी गेले. त्यावेळी त्याने आणि त्याच्या इतर दोन साथीदारांनी दोघांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
यात निशांत हा जखमी झाला आहे. तो अल्पवयीन आहे. घटनेनंतर त्याच्या आईने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.