‘त्या’ ‘कोरोना’ग्रस्ताचा फोटो व्हायरल, फेसबुक युजरविरुद्ध तक्रार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/6-13.jpg)
सोलापूर |महाईन्यूज|
पुण्यातील ‘कोरोनाग्रस्त’टॅक्सीचालक मूळचा सोलापूर जिल्ह्यातील गुरसाळेचा असून, गेल्या दोन दिवसांपासून त्याच्या नातेवाईकांना वेगळ्याच त्रासाला तोंड द्यावे लागत असल्याचे उघडकीस आले आहे. एका अतिउत्साही कार्यकर्त्याने या रुग्णाच्या फोटो-नावासहित माहिती फेसबुकवर व्हायरल केल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातही विनाकारण घबराट निर्माण झाली.
दुबईहून पुण्यात आलेल्या एका दाम्पत्याला टॅक्सीतून घेऊन गेल्यानंतर संबंधित टॅक्सीचालकालाही कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, या सर्वांवर व्यवस्थित उपचार सुरू असतानाच मांजरी येथील एका अतिउत्साही कार्यकर्त्याने फेसबुकवर या टॅक्सीचालकाचा फोटो टाकून त्या खाली कोरोनाग्रस्त रुग्ण म्हणून माहितीही अपलोड केली.
पाहता पाहता ही पोस्ट व्हायरल होताच संबंधित रुग्णाच्या घराभोवती गर्दी होऊ लागली. या रुग्णाच्या नातेवाईकांनी घराबाहेर पडू नये, अशीही विनंती नागरिक करू लागले. सातत्याने लोकांचे फोन नातेवाईकांना येऊ लागले. शेवटी याला कंटाळून संबंधित रुग्णाच्या भावाने पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याकडे या अतिउत्साही कार्यकर्त्याच्या वादग्रस्त पोस्टबाबत तक्रार केली. संबंधित पोस्ट काढून टाकण्यात येण्याची मागणीही केली.
कोरोनासारख्या संवेदनशील आजाराच्या बाबतीत रुग्णाची माहिती फोटोसह जगासमोर आणणे, अत्यंत चुकीचे आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मी तक्रार केली आहेच; कृपया लोकांनी संयम बाळगून आम्हाला सहकार्य करावे.
टॅक्सी चालकाचा भाऊ, पुणे