तृप्ती देसाईंची इंदोरीकर महाराजांना नोटीस
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Trupti-desai-and-indorikar-Maharaj.jpg)
शिर्डी | निवृत्ती महाराज इंदोरीकर यांना तृप्ती देसाईंची वकिलामार्फत कायदेशीर नोटीस पाठवली आहे. महिलांचा अपमान केल्याबाबत इंदोरीकरांनी जाहीर माफी मागावी मागणी देसाईंनी केली आहे. दहा दिवसात जाहीर माफी त्यांनी मागितली नाही, तर न्यायालयात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
महिलांचा वारंवार अपमान करणारे इंदोरीकर यांनी महिलांचा अपमान केल्याबाबत कोणतीही जाहीर माफी मागितलेली नाही. तसेच अशी वक्तव्य मी पुढे कीर्तनात करणार नाही, असं कोणत्याही पत्रकार परिषदेमार्फत त्यांनी जाहीर केलेले नाही.
त्यांच्यावर PCPNDT कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यामुळे माझी बदनामी आणि चारित्र्यहनन गेले आठ दिवस सुरु आहे, जीवे मारण्याच्या धमक्याही मला येत आहेत, असं तृप्ती देसाईंनी नोटीसमध्ये म्हटलं आहे.
याबाबतीत त्यांनी तातडीने सर्व महिलांची जाहीर माफी मागावी आणि अशी वक्तव्य यापुढे करणार नाही, असं जाहीर करावे. यासाठी वकिलामार्फत तृप्ती देसाई यांनी नोटीस पाठवलेली आहे. ॲड. मिलिंद पवार, पुणे यांच्या माध्यमातून ही नोटीस इंदोरीकर यांच्या पत्त्यावर पाठवली असून दहा दिवसात जाहीर माफी त्यांनी मागितली नाही, तर न्यायालयात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.