ज्येष्ठ समीक्षक, लेखक शंकर सारडा यांचे निधन
![Senior critic, author Shankar Sarda passes away](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/shankar-sarda.jpg)
पुणे – ज्येष्ठ समीक्षक आणि बालसाहित्यकार शंकर सारडा यांचे गुरुवारी दुपारी त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. पार्किन्सन या आजाराने त्यांना गेल्या काही वर्षांपासून ग्रासले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. सारडा यांच्या इच्छेनुसार त्यांचे नेत्र दान करण्यात आले. दरम्यान, ज्येष्ठ समीक्षक आणि लेखक शंकर सारडा यांच्या निधनाने राज्याने एक दर्जेदार साहित्यिक आणि समीक्षक गमावला आहे, या शब्दांत सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी शंकर सारडा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली आहे.
शंकर सारडा यांचा जन्म ४ सप्टेंबर १९३७ रोजी महाबळेश्वर येथे झाला होता. न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग येथे शालेय शिक्षण आणि स. प. महाविद्यालयातून त्यांनी मराठी विषयातील पदवीचे शिक्षण घेतले. मुंबई विद्यापीठातून एम.ए. केल्यानंतर अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठातून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले. किशोरवयापासूनच त्यांचे लेखन आनंद, बालमित्र, साधना, मुलांचे मासिक यांसारख्या अंकांमधून प्रसिद्ध व्हायला सुरुवात झाली होती.
महाराष्ट्र टाइम्सची रविवार पुरवणी, महाराष्ट्र साहित्य पत्रिका, साधना, दैनिक देशदूत, लोकमित्र पुरवणी, लोकमत रविवार पुरवणी, ग्रंथजगत अशा विविध वृत्तपत्रांमधील कामाचा त्यांचा दीर्घ अनुभव आहे. त्यांनी साठहून अधिक पुस्तकांचे लेखन केले असून दोन हजारांहून अधिक पुस्तकांचे परीक्षण केले आहे. टॉल्स्टॉय, गिबन यांसारख्या लेखकांच्या कादंबऱ्यांचा त्यांनी अनुवाद केला आहे. सारडा यांचे १९५० पासून बालसाहित्यात मोठे योगदान आहे. ‘झिपऱ्या आणि राणी’, ‘नंदनवनाची फेरी’, ‘दूरदेशचे प्रतिभावंत’, ‘मांत्रिकाची जिरली मस्ती’, ‘स्त्रीवादी कादंबरी’, ‘मर्कटराजाच्या लीला’, ‘चतुर चंपा’, ‘मधुमुरली’ अशा बालसाहित्यातील पुस्तकांसह ‘विश्वसाहित्यातील फेरफटका’, बेस्टसेलर बुक्स’, ‘ग्रंथ संवत्सर’, ‘ग्रंथ वैभव’, ‘ग्रंथ विशेष’ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.
सावतंवाडी येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सारडा यांनी भूषवले होते. तसेच सातारा ग्रंथ महोत्सव समितीचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे जीवनगौरव पुरस्कारासह ह. मो. मराठे स्मृती गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.