Breaking-newsपुणे
ज्ञानदीप विद्यालयाला सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीनची भेट
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/04/inner-wheel-club-of-nigdi-pride-2.jpg)
इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडचा स्तुत्य उपक्रम
पिंपरी – रुपीनगर येथील ज्ञानदीप विद्यालयाला इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या वतीने सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन व इन्सिनरेटर बसविण्यात आले. शाळेतील विद्यार्थिनी, शिक्षिका आणि परिसरातील महिलांना याचा लाभ होणार आहे.
यावेळी इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या अध्यक्षा सविता राजापूरकर, माजी अध्यक्षा रेणू मित्रा, उपमुख्याध्यापिका हेमलता सरोदे, शाळेतील शिक्षिका आणि विद्यार्थी उपस्थित होते. या उपक्रमाचा शाळेतील 1500 विद्यार्थिनींना लाभ होणार आहे. सॅनिटरी नॅपकिन मशीनमुळे परिसरात स्वच्छता राखली जाणार आहे. सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीनमधून नवीन सॅनिटरी नॅपकिन मिळणार आहे. तर इन्सिनरेटर या मशीनमध्ये वापरलेले नॅपकिन जमा करता येणार आहेत. यामुळे सॅनिटरी नॅपकिन रस्त्यावर, कचराकुंड्यांमध्ये उघड्यावर टाकल्याने उद्भवणा-या विविध त्रासांपासून सुटका मिळणार आहे. इन्सिनरेटरद्वारे वापरलेल्या सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट लावण्यात येते.
इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या अध्यक्षा सविता राजापूरकर म्हणाल्या की, विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन मिळणे ही काळाची गरज आहे. घरातील कामे, शाळा, क्लासेस आणि अन्य बाबींसाठी त्यांना बाहेर फिरावे लागते. मात्र सॅनिटरी नॅपकिनच्या अभावामुळे त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. याचा शाळेतील विद्यार्थिनी आणि शिक्षिका लाभ घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.