जुन्नर तालुक्यातील युवा सरपंचाच्या बॅनरचीच सगळीकडे चर्चा
![The banner of the young sarpanch of Junnar taluka is being discussed everywhere](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/जुन्नर.jpg)
जुन्नर – जुन्नरच्या आदिवासी भागातील युवा सरपंचाच्या निवडीचे भले मोठे बॅनर तालुक्यात चर्चेचा विषय ठरले आहे.
ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्यानंतर लगेचच बॅनर लागल्याने आचारसंहितेचा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. यावर ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता नगरपालिका क्षेत्रात नसल्याचा खुलासा निवासी नायब तहसीलदार सचिन मुंढे यांनी केला आहे.
वाचा :-धक्कादायक! पुण्यात पोलीस स्टेशनमध्येच महिलेने केला आत्महत्येचा प्रयत्न!
या सरपंचाची नुकतीच एका राजकीय पक्षाच्या राज्य पातळीवर सरचिटणीसपदी निवड झाली. त्यांच्या चाहत्यांनी (की त्यांनीच) जुन्नरच्या नवीन बसस्थानकाबाहेर सुमारे ११५ फूट लांब व २२ फूट रुंदीचा फ्लेक्सचा शुभेच्छा बॅनर तयार केला आहे. या बॅनरवर राज्यातील नेत्यांसह, तालुक्यातील नेते व पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांचे साडेसहा हजाराहून अधिक फोटो असल्याची चर्चा रंगत आहे. तर या बॅनरवर एवढ्या मोठ्या फोटोंच्या गर्दीत आपण कोठे आहोत का ? हे पाहण्यासाठी कार्यकर्ते माना वरखाली करून दमत आहेत ते वेगळेच. रात्री नीट दिसत नसल्याने काहीजण दिवसा फोटोचा शोध घेत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
काही जण सोशल माध्यमातून प्रसिद्ध झालेल्या बॅनरचा फोटोतून शोध घेत आहेत; मात्र बॅनरवर जेवढा फोटो स्पष्ट दिसतो तो मोबाइलमध्ये दिसत नसल्याचे सांगण्यात आले. हा बॅनर येथे आणखी दहा दिवस राहणार असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे दहा दिवस आणि पुढे आणखी काही दिवस ही चर्चा मात्र रंगणारच आहे.
यापूर्वी देखील त्याचे वडिलांचा दोन हजार फोटोंचा शुभेच्छा बॅनर लागला होता. उच्चशिक्षित युवा सरपंच यांचा प्रथमच पक्षीय प्रवेश झाला आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणूक डोळ्यासमोर असल्याचे बोलले जात आहे. वडिलांची मात्र गेल्या पंधरा वर्षात प्रमुख राजकीय पक्षात जा-ये राहिली आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून ते राजकारणात आल असले तरी सध्या ते एका पक्षात तर वडील दुसऱ्या पक्षात अशी स्थिती आहे. बॅनरच्या फंड्यांमुळे हे पिता-पुत्र नेहमीच चर्चेत असतात.