जिल्हाधिकारी कार्यालयातील सुरक्षा कर्मचाऱ्याचे नागरिकांशी उद्धट वर्तन
![District Magistrate Office, Pune, Yethil security personnel are welcome to the citizens.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/jiladhikari.jpg)
– महाराष्ट्र भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप नाईक यांची निलंबनाची मागणी
पिंपरी । प्रतिनिधी
जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथील सुरक्षा कर्मचारी नागरिकांशी उद्धटपणे वागत आहे. त्याचा सर्वसामान्य लोकांना त्रास होत आहे. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्याचे तातडीने निलंबित करून त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते व महाराष्ट्र भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
नाईक यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, या प्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यावर तातडीने कारवाई करावी; अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल. दोन दिवसांपूर्वी कामानिमित्त कार्यालयात आम्ही गेलो. सोबत मावळचे उपविभागीय अधिकारी तसेच इतर सन्माननीय देखील होते. कोरोनामुळे जिल्हाधिकाऱ्यांना सर्वांनाच भेटता येत नाही. त्यामुळे उपविभागीय अधिकारी आत भेटीसाठी गेले असता बाकी सदस्य बाहेर बसले होते. फोन आल्यामुळे आपण थोडे बाजूला गेलो.
त्या वेळेस शासकीय सेवक असलेल्या सातपुते नावाच्या सुरक्षारक्षकाने आपल्याला हटकले. ‘ए, काय करतोस येथे? काय काम आहे? एका जागेवर बसता येत नाही का,’ अशा एकेरी व उर्मट भाषेत जाब विचारला. शासकीय सेवकांनी त्यांच्याशी उर्मटपणे वागणे, हा शिस्तभंग मानून संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात यावी. संबंधित कर्मचाऱ्याबाबत अनेक नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्याची गंभीर दखल शासनाने घ्यावी. आपल्या वागणुकीत सुधारणा होत नसेल तर अशा कर्मचाऱ्यांना घरी पाठवा. त्यांना सेवामुक्त करा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली.