चंद्रभागेत मिसळतेय मैलामिश्रित सांडपाणी ; प्रशासनाचा वारक-याच्या भावनेशी खेळ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/2pandharpur_chandrabhaga.jpg)
पंढरपूर – लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या चंद्रभागा नदीच्या प्रदूषण आणि स्वच्छतेकडे स्थानिक प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. आषाढी एकादशीचा सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना शहरातील मैलामिश्रित पाणी आजही चंद्रभागेत मिसळत असल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे.
चंद्रभागा नदीतील जलशुद्धीकरणासाठी राज्य सरकारने गंगा नदीच्या धर्तीवर ‘नमामि चंद्रभागा’ ही योजना जाहीर केली आहे. यासाठी कोट्यवधी रुपयांची घोषणा केली आहे. मात्र, शुद्धीकरणासाठी दोन वर्षांमध्ये एक रुपयादेखील खर्च झालेला नाही. ही योजना आजही कागदावरच आहे.
चंद्रभागा नदी पात्राच्या प्रदूषण आणि स्वच्छतेकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष द्यावे, असे न्यायालयाचे निर्देश असताना देखील स्थानिक प्रशासनाकडून मात्र अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे या प्रकारानंतर समोर आले आहे. घाण पाण्यामुळे नदीला गटारगंगेचे स्वरूप आल्याने तिचे पावित्र्य धोक्यात आले आहे.
शहरातील घाण पाणी वाहून जाण्यासाठी नदीकाठच्या भागात ड्रेनेज पाइप टाकण्यात आले आहेत. कुंभार घाटाजवळ गटारीचे पाणी साठवण्यासाठी मोठा खड्डा आहे. त्यातील पाणी पंपाद्वारे उपसा करून अन्य ठिकाणी सोडले जाते. पावसाचे पाणी नदीपात्रात गेले होते. तेही तत्काळ बंद केले.
– अभिजित बापट, मुख्याधिकारी, नगरपालिका, पंढरपूर