गरज तेथेच सायकल ट्रॅक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/bicycle-clipart-cycling-.jpg)
- पहिल्या टप्प्यातील नियोजन : सलग रस्ता आवश्यक
पुणे – पुणे सायकल आराखडा प्रकल्पांतर्गत शहरात पहिल्या टप्प्यात गरज आहे तिथे आणि सुरक्षित तसेच सलगता असेल, अशा रस्त्यावरच नवीन सायकल ट्रॅक उभारले जाणार आहेत. या प्रकल्पासाठी महापालिकेच्या 2018-19 च्या अंदाजपत्रकात सुमारे 53 कोटी रुपयांची तरतूद आहे. यासाठी सर्वेक्षणाचे काम हाती घेतल्याची माहिती प्रशासनाने दिली.
शहरात सायकल चालवणे अधिकाधिक सुरक्षित होण्यासाठी लवकरच जनजागृती मोहीम हाती घेतली जाणार आहे. यात शाळा-महाविद्यालये तसेच गर्दीच्या प्रमुख ठिकाणी ही मोहीम राबवली जाणार आहे. महापालिकेने 2007 पासून केंद्राच्या “जेएनएनआरयूएम’ योजनेंतर्गत सुमारे 123 किलोमीटरचे सायकल ट्रॅक शहरातील प्रमुख रस्त्यावर उभारले आहेत. मात्र, गेल्या दहा वर्षांत हे सायकल ट्रॅक सायकलींपेक्षा अतिक्रमणे आणि पार्किंगसाठीच वापरले जात आहेत.
आकडे 2018-2019
123 कि.मी.
सध्या उपलब्ध असलेले सायकल ट्रॅक53 कोटी रुपये
नवीन रस्त्यांसाठीची तरतूद
उद्देशालाच हरताळ
तर या ट्रॅकला सलगता नसल्याने काही अंतर ट्रॅकवरून तर काही अंतर जीव मुठीत घेऊन मुख्य रस्त्यांवरून सायकल वापरावी लागते. त्यामुळे पुणेकरांना सायकल चालविताना अपघाताचा सामना करावा लागतो. त्यामुळे एका बाजूला पालिकेकडून शहरात नाममात्र दारात पुणेकरांना सायकली उपलब्ध करून देण्यात येत असल्या, तरी अनेक पुणेकर केवळ सकाळी व्यायामासाठी त्या वापरात असून दिवसभर घराबाहेर लावून ठेवत आहेत. परिणामी, ज्या खासगी वाहने कमी करण्याच्या उद्देशाने ही योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. त्या उद्देशालाच हरताळ फासला आहे.
सुरक्षित प्रवासासाठी जनजागृती
नागरिकांचा सायकल प्रवास अधिकाधिक सुरक्षित होण्यासाठी जनजागृती मोहीम राबविली जाणार आहे. त्यात प्रामुख्याने पादचाऱ्याप्रमाणे सायकलस्वारांना प्राधान्य देण्यात यावे, अपघात होणार नाही यासाठी दुचाकी तसेच इतर वाहनांनी काय खबरदारी घ्यावी, सायकल ट्रॅकवर अतिक्रमण होणार नाही यासाठी ही मोहीम हाती घेतली जाणार आहे.
- रस्त्यांचे सर्वेक्षण सुरू
नागरिकांनी फक्त व्यायामासाठी नव्हे, तर दैनंदिन कामकाजातही सायकल वापरावी, यासाठी गरज निश्चित करून त्या ठिकाणी सायकल ट्रॅक उभारले जाणार आहेत. त्यात पहिल्या टप्प्यात, महाविद्यालये, आयटी कंपन्या तसेच इतर काही गर्दीच्या ठिकाणाचा समावेश असेल. त्यामुळे विद्यार्थी तसेच कंपन्यांच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना कामापर्यंत जाण्यासाठी सायकल आणि सलग तसेच सुरक्षित ट्रॅक मिळाल्यास ते खासगी वाहने वापरणार नाहीत, अशी ठिकाणे आणि रस्त्याचे सर्वेक्षण पालिकेकडून हाती घेण्यात आले. त्यानुसार पहिल्या टप्प्यात सरसकट सगळ्या रस्त्यावर ट्रॅक न उभारता ज्या ठिकाणी वापर जास्त होईल, अशा रस्त्याची निवड केली जाणार आहे.