कचरा संकलनास चौथ्यांदा मुदतवाढ देणा-यांची चौकशी करा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/04/maruti-bhapkar.jpg)
- सभापती ममता गायकवाड यांना मारुती भापकर यांचे निवेदन
पिंपरी – शहरातील घरोघरचा कचरा गोळा करून तो मोशी काचरा डेपोपर्यंत वाहून नेण्याच्या कामाची मुदत जुलै २०१६ रोजी संपुष्टात आलेली असताना त्याला चौथ्यांदा ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या प्रकरणातील भ्रष्ट सभापती, स्थायी सदस्य व प्रशासन अधिकाऱ्याची चौकशी करून संबंधित दोषींवर योग्य कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी केली आहे.
यासंदर्भात भापकर यांनी स्थायी समितीच्या विद्यमान सभापती ममता गायकवाड यांच्याकडे निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातील घरोघरचा कचरा टाटा एसीई वाहनांतून गोळा करून तो मोशी कचरा डेपोत नेऊन टाकण्याच्या कामास चौथ्यांदा तीन महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात येणार आहे. ही मुदत ३० जूनपर्यंत देण्यात येणार आहे. त्यासाठी तब्बल ५ कोटी ९९ लाख ५४ हजार ३३ रूपये खर्च अपेक्षित आहे. सदर प्रस्ताव मंजुरीसाठी बुधवारी (दि.४) होणार्या स्थायी समिती सभेपुढे ठेवण्यात आला होता.
शहरातील घरोघरचा कचरा गोळा करून तो मोशी कचरा डेपोत नेऊन टाकण्याचा ८ वर्षे कालावधीचा ठेका ए. जी. इन्व्हायरो इंफ्रा प्रोजेक्ट्स प्रा. लि. (दक्षिण भाग) आणि बीव्हीजी इंडिया लि. (उत्तर विभाग) या दोन कंपन्यांना देण्यास स्थायी समितीने २१ फेबु्रवारीला मान्यता दिली. कचरा वाहतुकीसाठी प्रत्येक मेट्रिक टनाला १ हजार ७८० रुपये दर निश्चित केला आहे. त्यात दरवर्षी ५ टक्के वाढ केली जाणार आहे. या संबंधित दोन ठेकेदारांशी आयुक्त, तत्कालीन सभापती, सर्व पक्षीय सदस्य यांनी अर्थ पूर्ण संगनमत करून २६ जुलै २०१६ ला पूर्वीच्या ठेकेदारांची मुदतवाढ संपुष्टात आलेली असताना निविदा प्रक्रियेला फाटा देऊन पूर्वीच्या ठेकेदारांना ३ वेळा मुदतवाढ दिली आहे. आता पुन्हा बुधवारी (दि. ४) स्थायी समिती समोर मुदतवाढीचा विषय आलेला आहे. ही सभा तहकूब झाल्यामुळे आता ११ एप्रिल रोजी स्थायी समिती समोर ठेवण्यात आला आहे. या मुदतवाढ प्रकरणात दोषी अधिकारी, तत्कालीन सभापती यांची चौकशी करण्यात यावी. दोषिंवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भापकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.