‘ईडी’ मागे लावली त्यांना सन्मानाने आमंत्रण, खासदार राजू शेट्टी संतापले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/Raju-Shetty.jpg)
पुणे |महाईन्यूज|
महाविकासआघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार सोहळ्याचे आमंत्रण न दिल्यामुळे घटकपक्षांच्या नाराजीत आणखीनच भर पडली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांनी आजच्या सोहळ्यानंतर आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली.
ज्यांनी ईडी, इनकम टॅक्स, सीबीआयची पीडा मागे लावली त्यांना शपथविधीसाठी सन्मानाने आमंत्रण देण्यात आले. मात्र, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ज्यांनी नुकसान सोसून आटोकाट प्रयत्न केले त्या घटकपक्षांना शपथविधीवेळी बेदखल ठरवण्यात आले, अशी संतप्त प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी व्यक्त केली.
संविधान, लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता यावर श्रद्धा असणाऱ्या लहान पक्षांनी भाजपसारख्या संधीसाधू पक्षाची साथ सोडून महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली. मात्र, त्याच घटकपक्षांचा महाविकासआघाडीला विसर पडला. भविष्यात याची किंमत त्यांना चुकती करावी लागेल, असे राजू शेट्टी यांनी म्हटले.
दरम्यान, महाविकासआघाडीच्या मंत्रिमंडळ विस्तारात अपेक्षित वाटा न मिळाल्यामुळे घटकपक्ष कालपासून रुसून बसले आहेत. यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप, समाजवादी पक्ष, सिपीएम, बहुजन विकास आघाडी यांचा समावेश आहे.