अभिनेत्री सविता मालपेकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/Savita-Malpekar.jpg)
पुणे : प्रख्यात चित्रपट अभिनेत्री सविता मालपेकर राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ हाती बांधणार आहेत. अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्यापाठोपाठ सविता मालपेकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत.
सविता मालपेकर यांच्यासोबत गीतकार आणि अभिनेते बाबा सौदागर, प्रसिद्ध अभिनेत्री अर्चना नेवरेकरही राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतील. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत लवकर त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली.
अभिनेत्री सविता मालपेकर यांनी 1988 मध्ये ‘आई पाहिजे’ चित्रपटातून मनोरंजन विश्वात पदार्पण केलं. ‘गाढवाचं लग्न’ या नाटकातील त्यांची भूमिका प्रचंड गाजली. ‘काकस्पर्श’ सिनेमात आत्याच्या भूमिकेसाठी त्यांनी डोक्यावरील संपूर्ण केस काढले होते. याशिवाय त्यांनी अनेक मराठी नाटक-मालिकांमध्येही भूमिका केल्या आहेत.
हाहाकार, कुंकू लावते माहेरचं, गड्या आपला गाव बरा, स्वामी पब्लिक लिमिटेड, नटसम्राट, मुळशी पॅटर्न, शिकारी, मी शिवाजी पार्क, 7 रोशन व्हिला अशा सिनेमात त्यांनी भूमिका केल्या आहेत. ‘हथियार’ या हिंदी चित्रपटातही त्या झळकल्या आहेत.