अग्निशामक दलाचा उपअधिकारी व फायरमनला लाच घेताना पकडले
![लाच स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्याला ४ वर्षे सक्तमजुरी](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/lach-3.jpg)
पुणे – अग्निशामक दलाचा उपअधिकारी व फायरमन यांना लाच लूचपत प्रतिबंधक पथकाने 16 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. एका बांधकाम प्रकल्पासाठी अग्निशामक दलाचे ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी 25 हजाराची मागणी करण्यात आली होती. तडजोडीअंती त्यातील 15 हजार उपअधिकारी व एक हजार फायरमनने घेताना ही कारवाई पिंपरी-चिंचवड येथे करण्यात आली.
उप अधिकारी उदय माधवराव वानखेडे (52) व फायरमन अनिल सदाशिव माने (32) अशी आरोपींची नावे आहेत. यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, वाकड येथे एक बांधकाम प्रकल्प सुरु आहे. या प्रकल्पाला प्रोव्हिजनल फायर ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तक्रारदाराने अर्ज केला होता. पिंपरी-चिचंवड येथील संत तुकाराम नगर अग्निशमन केंद्रात हा अर्ज करण्यात आला होता. यातील वानखेडे यांनी ना हरकत प्रमाणपत्र फाईलची पूर्तता करून वरिष्ठांकडे पाठविली होती. यानंतर तक्रारदार यांना फायर एनओसी मिळाली होती. या कामाचा मोबदला म्हणून वानखेडे यांनी तक्रारदार यांच्याकडे 25 हजाराची मागणी केली होती. यासंदर्भात लाच लूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार प्राप्त होताच त्याची शनिवारी पडताळणी करण्यात आली. यानंतर सापळा रचून दोघांनाही लाचेची रक्कम स्वीकारताना पकडण्यात आले. त्यांच्यावर पिंपरी-पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.