अंगारकी दिवशी बाप्पाचं दर्शन नाही; दगडूशेठ हलवाई मंदिर बंद, सिद्धिविनायक मंदिरात नवे नियम
![There is no darshan of Bappa on the day of Angarki; Dagdusheth Halwai temple closed, new rules in Siddhivinayak temple](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/dagdusheth2.jpg)
मुंबई – पुण्यामध्ये दिवसोंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून अंगारकी चतुर्थीला म्हणजेच मंगळवारी २ मार्च रोजी शहरातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील माहिती ट्र्स्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिलीय.कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खबरदारी म्हणून मंगळवार २ मार्च रोजी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून केवळ ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत मंदिरात धार्मिक विधी होतील, असं गोडसे यांनी स्पष्ट केलं आहे.
अंगारकी चतुर्थीला दरवर्षी पुणे शहर व उपनगरांमधून अंदाज तीन ते चार लाख भाविक गणरायांच्या दर्शनसाठी मदिरामध्ये येतात. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ही गर्दी टाळण्यासाठी मंगळवारी सर्वसामान्यांसाठी मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. अंगारकी चतुर्थीच्या दिवशी भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नसल्याचं ट्रस्टने सांगितलं आहे. दरम्यान करोनाच्या कालावधीमध्ये मंदिर प्रशासनाने भाविकांसाठी अनेक सुविधा ऑनलाइन माध्यमातून उपलब्ध करुन दिल्या आहेत. करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुण्यातील अनेक मंदिरांमध्ये हार, नारळ स्विकारण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मंदिरामधील स्वच्छता, सॅनिटायझेशन यासारख्या माध्यमांमधून अधिक स्वच्छता ठेवण्याकडे विशेष लक्ष दिलं जात आहे.
मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराचे नियमही बदलणार…
पुण्याप्रमाणेच मुंबईच्या प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टनेही एक मार्चपासून नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. आता मुंबईमधील या प्रसिद्ध मंदिरामध्ये देवाचं दर्शन घेण्यासाठी आधी ऑनलाइन नोंदणी करणं बंधनकारक राहणार आहे. मंदिराच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंका छापवाले यांनी दिलेल्या माहितीनुसार एक मार्चपासून ऑनलाइन नोंदणीच्या माध्यमातून भाविकांना दर्शन घेता येणार आहे. एका तासामध्ये मंदिरात केवळ १०० भक्तांना परवानगी देण्यात येणार आहे. सध्या भक्तांची नोंदणी न करता त्यांना मंदिरामध्ये प्रवेश देतानाच क्यूआर कोड दिला जातोय. मात्र एक तारखेपासून यामध्येही मोठा बदल होणार आहे. आधी ऑनलाइन नोंदणी केली नसेल तर भक्तांना मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे.