breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

बोपखेल पुलाच्या कामासाठी आरक्षणे ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू

  • आयुक्त राजेश पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले कामाचे आदेश
  • दिघी, बोपखेलमधील प्रलंबित प्रश्नांबाबत उपमहापौरांच्या उपस्थितीत झाली बैठक

पिंपरी / महाईन्यूज

बोपखेलवासियांसाठी मुळा नदीवर बांधण्यात येणाऱ्या पुलाचे काम पूर्ण झाले आहे. संरक्षण विभागाच्या जागेतील कामासाठीची अंतिम ‘वर्किंग’ परवानगी मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. संरक्षण विभागाच्या सचिवांकडे फाईल असून लवकरच मान्यता मिळेल. तसेच दिघी-बोपखेल येथील विविध आरक्षणे ताब्यात घेण्याची कार्यवाही, दिघीतील भिंती कडेच्या 15 मीटर रस्त्याची निविदा काढण्यास आयुक्त राजेश पाटील यांनी मान्यता दिली आहे. दिघी-बोपखेलमधील विविध प्रश्न सोडविण्याबाबत आयुक्तांनी अनुकूल भूमिका घेतली. त्यामुळे दिघी, बोपखेलमधील प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लागतील, असा विश्वास उपमहापौर हिराबाई उर्फ नानी घुले यांनी व्यक्त केला आहे.

प्रभाग क्रमांक चार दिघी-बोपखेलमधील विविध प्रलंबित कामांबाबत उपमहापौर हिराबाई घुले यांच्या मागणीनुसार आयुक्त राजेश पाटील यांनी अधिकाऱ्यांची शुक्रवारी (दि.28) बैठक घेतली. उपमहापौर घुले, नगरसेवक विकास डोळस, नगरसेविका निर्मला गायकवाड, शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन घुले, शहर अभियंता राजन पाटील,  बीआरटीएस विभागाचे सह शहरअभियंता श्रीकांत सवणे, पाणीपुरवठा विभागाचे प्रवीण लडकत, स्थापत्य, ड्रेनेज, पर्यावरण, उद्यान, पाणीपुरवठा विभागाचे सर्व अधिकारी बैठकीला उपस्थित होते. उपमहापौर घुले यांनी प्रलंबित प्रश्न सांगितले. प्रत्येक प्रश्नांवर चर्चा करून मार्गी लावण्याचे आदेश आयुक्त पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

बोपखेलवासीयांसाठी मुळा नदीवर पूल बांधण्यात येत आहे.  नदीवरील पुलाचे काम पूर्ण झाले आहे. आता संरक्षण विभागातील काम बाकी आहे.  ते काम चालू करण्यासाठी संरक्षण विभागाची वर्किंग परवानगी आवश्यक आहे. ती परवानगी मिळाल्यानंतर काम सुरू करता येणार आहे. त्यामुळे  वर्किंग परवानगी मिळण्यासाठी महापालिका प्रशासनाने जलदगतीने पाठपुरावा करावा अशी सूचना उपमहापौर घुले यांनी केली. त्यावर आयुक्त पाटील यांनी तत्काळ संरक्षण विभागाच्या संचालकांशी संपर्क साधला. त्याबाबतची फाईल संरक्षण विभागाच्या संचालकांकडे होती. आयुक्तांशी चर्चा झाल्यानंतर  संचालकांमार्फत  संरक्षण विभागाच्या सचिवांकडे फाईल गेली आहे.  संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या स्वीय सहाय्यकांशीही बातचीत केली आणि बोपखेल पुलाची वर्किंग परवानगी लवकरात लवकर देण्याची कार्यवाही करावी अशी आयुक्तांनी विनंती केली. परवानगीचा हा शेवटचा टप्पा असून लवकरच ‘वर्किंग’ परवानगी मिळेल, असा आशावाद उपमहापौर घुले यांनी व्यक्त केला.  वर्किंग परवानगी मिळताच तत्काळ पुलाचे काम पूर्ण केले जाईल असेही त्यांनी सांगितले.

त्याचबरोबर दिघी-बोपखेल मधील विविध आरक्षणे, 15 मीटर रस्त्याची निविदा, दिघी जकात नाका ते व्हीएसएनएल रस्त्याची जागा ताब्यात घेण्याच्या सूचना आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. याशिवाय बोपखेल फाटा ते बोपखेल रस्त्याच्या डांबरीकरणासही आयुक्तांनी मान्यता दिली. त्यामुळे लवकरच रस्त्याचे काम सुरू होईल. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) ‘एनजीटी’त अडकला होता. तेथून त्याचा मार्ग मोकळा झाला आहे.  त्यामुळे पुढील कार्यवाही करून काम सुरू करण्याचे आदेश आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. दिघी-बोपखेल मधील सर्व प्रलंबित प्रश्नांवर आयुक्तांनी अनुकूल भूमिका घेतली. प्रलंबित कामे मार्गी लावण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत, असे उपमहापौर घुले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button