TOP Newsताज्या घडामोडीविदर्भ

मेडिकलमध्ये खासगी रुग्णालयाचे दलाल?

मेडिकल रुग्णालयात जीवनरक्षण प्रणाली अभावी (व्हेंटिलेटर) नुकताच एका मुलीचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता येथील आपत्कालीन विभागातून खासगी रुग्णालयात रुग्ण पळवणारे दलाल सक्रिय झाल्याचा आरोप होत आहे. मेडिकल प्रशासनाने मात्र सर्व आरोप फेटाळले आहेत.

पळवण्यात आलेला रुग्ण हा पांढरकवडा येथील आहे. तो अपघातात जखमी झाल्याने काही दिवसांपूर्वी मेडिकलच्या आपत्कालीन विभागात आला होता. येथे रुग्णवाहिकेतून उतरण्यापूर्वीच दोघांनी त्याला गाठले. धंतोलीतील खासगी रुग्णालयात चांगले उपचार होत असून मेडिकलला खूप गैरसोयीचा सामना करावा लागेल, अशी भीती दाखवली.आयुष्यमान योजनेचे कार्ड असेल तर खासगीतही मोफत उपचाराचा दावा केला. रुग्णाला धंतोलीतील खासगी रुग्णालयात नेले गेले. तेथे दाखल केल्यानंतर मात्र ६० हजार रुपये खर्च लागेल असे सांगण्यात आले.

परंतु, उपचारानंतर मात्र रुग्णाच्या हाती १ लाख ५ हजारांचे बिल देण्यात आले. दरम्यान, दिवाळीच्या सुट्या लागल्याने मेडिकलचे निम्मे वरिष्ठ डॉक्टर सुट्टीवर आहेत. ही बाब हेरून येथील रुग्ण खासगी रुग्णालयात पळवले जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अनिकेत कुत्तरमारे यांनी केला आहे. परंतु याबाबत प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शरद कुचेवार म्हणाले, मेडिकलच्या आपत्कालीन विभागासमोर सुरक्षारक्षक तैनात आहेत. रुग्णालयाच्या आत प्रवेश केल्यानंतर रुग्णाला पळवून नेणे शक्य नाही.

मात्र, बाहेरच्या बाहेरून असे प्रकार होत असतील तर सुरक्षा रक्षकांना नजर ठेवण्यास सांगितले आहे. दरम्यान, अनिकेत कुत्तरमारे यांनी या गरीब रुग्णावर उपचारासाठी काही लोकांनी वर्गणी करून २४ हजार रुपये गोळा केल्याचे सांगितले. परंतु इतर रकमेसाठी नातेवाईक पुन्हा गावात वर्गणी करण्यासाठी गेल्याचा दावा केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button