breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

राजकारण : ‘‘भाजपा फुटणार’’ या भ्रमातील राष्ट्रवादीला ‘चपराक’

माजी नगरसेवक शंकर जगताप यांचा झंझावात

नोकरी महोत्सवात झाडून सर्व नगरसेवकांची उपस्थिती

पिंपरी । विशेष प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिका आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीत मोठी फूट पडेल. किमान २० ते २५ नगरसेवक बंडखोरी करतील, असा भ्रम बाळगूण गाफील राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला अक्षरश: चपराक बसली आहे.
चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप प्रकृतीच्या कारणास्तव विश्रांती घेत आहेत. अशा परिस्थितीत त्यांचे बंधू शंकर जगताप यांनी पक्षाची संघटनात्मक आणि मतदार संघातील यंत्रणा सक्षमपणे राबवण्यास सुरूवात केली आहे. माजी नगरसेवक असलेले शंकर जगताप अत्यंत मितभाषी आणि अभ्यासू म्हणून ओळखले जातात. भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्ठींनी त्यांच्याकडे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रभारीपदाची जबाबदारी सोपवली आहे.
दरम्यान, शंकर जगताप आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या सौभाग्यवती अश्विनी जगताप यांनी मतदार संघ पिंजून काढला आहे. विविध कार्यक्रम, उपक्रम आणि कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांची भेटी-गाठींवर भर दिला आहे. पक्षांतर्गत नाराज माजी नगरसेवकांनीही मिळते-जुळते घेण्याची भूमिका घेतल्यामुळे सध्या राष्ट्रवादी भ्रमनिरास झाला आहे, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.
चिंचवड मतदार संघाला ‘फोकस’ करुन शंकर जगताप यांनी नुकताच नोकरी मोहोत्सव घेतला. याला मतदार संघातील सर्व प्रभागांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे, सर्वच इच्छुकांनी आणि माजी नगरसेवकांनी या उपक्रमात प्रत्यक्ष योगदान दिले. त्यामुळे जगताप यांचा नोकरी महोत्सव यशस्वी झाला. परिणामी, भाजपात फूट पडेल आणि राष्ट्रवादीची ताकद वाढेल, असा भ्रम राष्ट्रवादीने ठेवू नये, अशी अपेक्षा राष्ट्रवादीतील निष्ठावंतांकडून व्यक्त केली जात आहे.
कलाटे-जगताप सामना रंगणार…
चिंचवड विधानसभा मतदार संघात भाजपाकडून शंकर जगताप आणि महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे माजी गटनेते राहुल कलाटे यांच्या नेतृत्त्वाखाली महापालिका निवडणूका लढवल्या जातील. कारण, २०१९ मध्ये भाजपाविरोधात कलाटे यांना राष्ट्रवादी, काँग्रेस आणि वंचित आघाडीने समर्थन दिले होते. यापूर्वी, दोनदा कलाटे यांनी विधानसभा निवडणूक लढवली आहे. महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी किंवा समविचारी नगरसेवक जास्ती-जास्त निवडून आणणे आणि तिसऱ्या प्रयत्नात विधानसभेत धडक देण्याची रणनिती कलाटे यांनी आखली आहे. त्यामुळे जगताप- कलाटे पुन्हा एकदा संघर्ष पहायला मिळणार आहे. यासह भाजपा आणि स्थानिक नेत्यांवर नाराज असलेले पिंपळे निलख येथील माजी नगरसेवक तुषार कामठे यांच्या रामकथा कार्यक्रमाला अश्विनी जगताप यांनी हजेरी लावली. त्यामुळे मतदार संघातील नाराजांची मोट बांधण्यास जगताप कुटुंबियांना यश मिळताना दिसत आहे, असा दुजोराही राजकीय विश्लेषकांनी दिली आहे.
भोसरीत राष्ट्रवादीकडे सक्षम उमेदवार नाहीत?
दुसरीकडे, भोसरी विधानसभा मतदार संघात विद्यमान शहराध्यक्ष आणि आमदार महेश लांडगे यांच्या विरोधात नाराजी उफाळून येईल, अशी आशा राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना होती. मात्र, महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या सत्ताकाळात मोशीतील वसंत बोराटे आणि चिखलीतील संजय नेवाळे यांचा अपवाद वगळता राष्ट्रवादीला काही मजबूत हाती लागले नाही, ही वस्तुस्थिती आहे. किंबहुना, भोसरी मतदार संघातील अनेक प्रभागांमध्ये राष्ट्रवादीकडे सक्षम उमेदवार नाहीत. त्यामुळे भाजपातील नाराजांवर राष्ट्रवादीची भिस्त आहे, असे चित्र आहे. परिणामी, राष्ट्रवादीला महापालिकेत पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी प्रचंड झगडावे लागेल, असेही राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button