‘बाबरनं ५०० वर्षांपूर्वी अयोध्येत जे केलं, तेच आज बांगलादेशात होतंय’; योगी आदित्यनाथ

Yogi Adityanath | ५०० वर्षांपूर्वी बाबरच्या सेनापतींनी जे अयोध्या आणि संभलमध्ये केले तेच आज बांगलादेशमध्ये होत आहे. या तिघांचीही नियत एकसारखी आहे. तिघांचाही डीएनए समान आहे. अयोध्येतील राम कथा पार्क येथे ४३ व्या रामायण मेळ्याचे उद्घाटन करत असताना योगी आदित्यनाथ यांनी हे उद्गार काढले.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, आपले शत्रू शेजारी राष्ट्रात कशाप्रकारचे कृत्य करत आहेत, हे एकदा पाहा. जर कुणी भ्रमात वावरत असेल तर त्यांनी डोळे उघडून पाहावे. ५०० वर्षांपूर्वी बाबरच्या सेनापतींनी अयोध्या आणि तशाचप्रकारचे कृत्य संभलमध्ये केले. तेच आज बांगलादेशमध्ये होत आहे. या तीनही कृत्यांना जबाबदार असलेल्या लोकांची नियत आणि डीएनए एकसमान आहे. जर आपण एकतेला महत्त्व दिले असते तर आपल्यावर आक्रमण करणाऱ्या शत्रूचे डावपेच कधीच यशस्वी होऊ शकले नसते. त्यांना आपल्यात सामाजिक वैमनस्य निर्माण करता आले नसते आणि हा देश गुलाम झाला नसता. तसेच आपल्या तीर्थक्षेत्रांची विटंबणाही झाली नसती. मूठभर आक्रमणकर्त्यांना आपल्या भूमीवर चालून येण्याची हिंमत झाली नसती, आपल्या सैनिकांनी त्यांचा बंदोबस्त केला असता.
हेही वाचा – ‘गृहमंत्रीपद आमच्याकडेच राहिलं पाहिजे..’; देवेंद्र फडणवीसांची भूमिका
सामाजिक एकतेमध्ये अडथळे निर्माण करणारे यशस्वी झाले. त्यांची जनुके आजही अबाधित आहेत. जातीवर आधारित राजकारण करून समाजाची वीण उसविणारे आजही सक्रिय आहेत. सामाजिक सलोखा आणि एकात्मता नष्ट करण्यासाठी अथक प्रयत्न केले जात आहे. या शक्तींचा उद्देश समाजात तेढ, कलह निर्माण करणे आणि हिंसाचार घडविणे असा आहे. या फुटीरतावादी शक्तींनी जगभरात मालमत्ता विकत घेऊन ठेवल्या आहेत. जेव्हा इकडे संकट कोसळते, तेव्हा ते इकडच्या लोकांना मरायला सोडून तिकडे पळून जातात. हेच ते करत आले आहेत, अशीही टीका योगी आदित्यनाथ यांनी केली.





