Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

कुस्तीपटू प्रगती गायकवाडच्या जिद्दीला आता महापालिकेची “साथ”

महापौर रवि लांडगे यांचे आश्वासन; सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही, भाजपा नगरसेविका योगीता नागरगोजे यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी: पिंपरी-चिंचवड शहरातील आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू कु. प्रगती विनोद गायकवाड हिच्या क्रीडा कारकिर्दीला आर्थिक व संस्थात्मक पाठबळ देण्याबाबत महापालिकेकडून सकारात्मक भूमिका घेण्यात आली आहे. चिखली परिसरातील 19 वर्षीय प्रगतीने अल्पावधीतच आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत शहराचे नाव उज्ज्वल केले आहे.

महापालिकेच्या सभागृहात झालेल्या चर्चेदरम्यान भाजपा नगरसेविका योगीता नागरगोजे यांनी प्रगती गायकवाड हिच्या क्रीडा प्रवासाबाबत सविस्तर माहिती देत तिला विशेष आर्थिक सहाय्य, शिष्यवृत्ती, प्रशिक्षण सुविधा तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी आवश्यक प्रायोजकत्व देण्याची मागणी केली.

यावेळी प्रगतीच्या कामगिरीचा गौरव करत, महापौर रवि लांडगे यांनी तिला महापालिकेकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन दिले. तिच्या क्रीडा विकासासाठी आवश्यक त्या सर्व योजनांचा समावेश करून मदत केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रगती गायकवाडने आतापर्यंत 2026 ची महिला महाराष्ट्र केसरी (62 किलो गट) सुवर्णपदक, 2025 मधील व्हिएतनाम येथे झालेल्या सीनियर आशियाई कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक, तसेच राष्ट्रीय स्तरावर 15 पेक्षा अधिक पदके मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी स्पर्धेत सुवर्णपदक आणि सीनियर राष्ट्रीय स्तरावर तृतीय क्रमांक मिळवत तिने सातत्यपूर्ण कामगिरी नोंदवली आहे.

हेही वाचा : PCMC: महापालिका आरोग्य वैद्यकीय समितीला मंजुरी

सध्या आर्थिक मर्यादांमुळे तिच्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण, पोषण आहार व स्पर्धात्मक तयारीत अडथळे येत असल्याचे निदर्शनास आणण्यात आले. या पार्श्वभूमीवर महापालिकेने पुढाकार घेतल्यास ती भविष्यात ऑलिंपिकसारख्या जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करू शकते, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

दरम्यान, महापालिकेकडून तिला विशेष खेळाडू सहाय्य योजनेत समाविष्ट करणे, मासिक शिष्यवृत्ती, प्रशिक्षण सुविधा तसेच “क्रीडा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर” म्हणून सन्मान देण्याच्या मागणीलाही सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे समजते. प्रगती गायकवाडसारख्या युवा खेळाडूंना वेळेवर दिलेले पाठबळ हे केवळ मदत नसून शहराच्या क्रीडा भविष्यातील महत्त्वाची गुंतवणूक असल्याचे मतही या निमित्ताने व्यक्त करण्यात आले.

“प्रगती गायकवाड ही केवळ पिंपरी-चिंचवड शहराची नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची अभिमानाची खेळाडू आहे. तिने अत्यंत कठीण परिस्थितीतही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अशा गुणवंत खेळाडूंना आर्थिक अडचणींमुळे थांबू द्यायचे नाही, हीच आमची भूमिका आहे. त्यामुळे महापालिकेने तिला तातडीने विशेष आर्थिक सहाय्य, प्रशिक्षण सुविधा आणि सर्व आवश्यक पाठबळ द्यावे, अशी आमची ठाम मागणी आहे. योग्य संधी मिळाल्यास प्रगती निश्चितच ऑलिंपिक स्तरावर भारतासाठी पदक जिंकू शकते.
– योगीता नागरगोजे, नगरसेविका, भाजपा, पिंपरी-चिंचवड महापालिका.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button