Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

शिवसेना शिंदे गटात मोठा भूकंप होणार? अनिल गोटे यांचा खळबळजनक दावा

मुंबई : माजी आमदार अनिल गोटे यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबाबत खळबळजनक दावा केला आहे. त्यांचा हा दावा खरा ठरला तर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप येण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांनी दोन वर्षांपूर्वी शिवसेना पक्षात मोठं बंड पुकारलं आणि सत्तांतर घडवून आणलं. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच एकट पाडलं. पण लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे आणि विशेषत: भाजपला त्याचा मोठा फटका बसला. महायुतीचे नेते लोकसभा निवडणुकीत 40 पेक्षा जास्त जागा जिंकून येण्याचा दावा करत होते. पण त्यांच्या या दाव्यांमधील हवा निघून गेली आहे. कारण महाराष्ट्रात घडलेल्या फोडाफोडीच्या राजकारणाला जनतेने मतदानातून प्रत्युत्तर दिलं आहे. ठाकरे गटाला मिळालेल्या सहानुभूतीचा राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसला देखील मोठ्या प्रमाणात झालाय. सध्याची ही परिस्थिती पाहता येत्या सहा महिन्यात विधानसभा निवडणुकीच्या आधी शिंदे गटाचे खासदार उद्धव ठाकरे यांच्याकडे परततील, असा खळबळजनक दावा अनिल गोटे यांनी केला आहे.

अनिल गोटे यांच्या या दाव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात खूप मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे देशाच्या लोकसभा निवडणुकीचा निकाल हा अतिशय वेगळा लागला आहे. देशात कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालेलं नाही. असं असलं तरी एनडीए आघाडीला बहुमत आहे. त्यामुळे भाजपप्रणित एनडीए आघाडी सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. भाजपला महाराष्ट्रात मोठा झटका बसला आहे. महाराष्ट्रात भाजपला केवळ 9 जागांवर यश मिळालं आहे. विशेष म्हणजे भाजपच्या दिग्गज नेत्यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे भाजपला हा पराभव खूप जिव्हारी लागला आहे.

हेही वाचा  – नागरिकांसाठी खुशखबर..! महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन, हवामान विभागाची माहिती 

महाराष्ट्रातील भाजपचे प्रमुख नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेतील पराभवाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांनी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला पक्ष संघटनेच्या कामासाठी आपल्याला उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीपासून मुक्त करण्याची विनंती केली आहे. पण महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचा फडणवीसांच्या या भूमिकेला विरोध आहे. सराकरमध्ये राहूनही पक्षासाठी काम केलं जाऊ शकतं, असं त्याचं म्हणणं आहे. महाराष्ट्र भाजपमध्ये या सर्व घडामोडी एकीकडे घडत असताना माजी आमदार अनिल गोटे यांनी भाजपचा पराभव आणि लोकसभा निवडणुकीच्या निकालाचं विश्लेषण करताना देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधलाय.

“देशाच्या जनतेने नरेंद्र मोदींना नाकारले आहे. भाजपच्या केवळ 165 जागा अवघ्या दोन हजार मतांच्या फरकाने जिंकल्या आहेत. केवळ 74 जागा भाजपच्या शिल्लक राहतात. जनतेने मोदींना नाकारण्याचं यापेक्षा वेगळं उदाहरण काय? 106 विजयी उमेदवार हे पूर्वाश्रीचे काँग्रेसचे उमेदवार आहेत”, असा दावा अनिल गोटे यांनी केला.

“देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा देण्याचे संकेत देणं हे फक्त नाट्य आहे. राजीनामा द्यायला काय लागतं? देवेंद्र फडणवीस यांचं वागणं असं आहे की, हम डुबेंगे सनम, आपको भी लेके डुबेंगे. भाजप जोपर्यंत डुबत नाही तोपर्यंत फडणवीस राजीनामा देणार नाहीत. देवेंद्र फडणवीस यांना एक गोष्ट सिद्ध करायची होती की, मी मुख्यमंत्री होतो. ही गोष्ट सिद्ध करायची होती. यापुढे तसे होणार नाही आणि त्यांना कोणी करणारही नाही”, अशी टीका अनिल गोटे यांनी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button