महायुती एकत्र लढणार की स्वबळावर? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका

Devendra Fadnavis : राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद आणि नगरपंचायतींमधील निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबर 2025 ला मतदान होणार असून, 3 डिसेंबर 2025 ला मतमोजणी होणार असल्याचं निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे.
यानंतर आता भाजपकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. मात्र महायुतीमधील तिन्ही पक्ष एकत्र लढणार का? याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महायुतीमधील तिन्ही पक्ष आपापल्या परीने ज्या त्या स्तरावर युतीबाबत निर्णय घेतील, असे फडणविसांनी स्पष्ट केले आहे.
कोल्हापुरात प्रसारमाध्यामांसोबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, “निवडणुकांची घोषणा झाली असून आम्ही त्या निवडणुकांना सामोरं जाऊ. आमचे तिन्ही पक्ष आपापल्या परीने संबंधित स्तरावर युतीबाबत निर्णय घेतील. कोणत्याही परिस्थितीत आम्ही तिघे एकच आहोत. कुठे युती झाली नाही तर निवडणुकीनंतर युती होईल. त्यामुळे नगरपालिकेच्या निवडणुकीत महाराष्ट्राची जनता मोठ्या प्रमाणात महायुतीलाच कौल देईल,” असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा – डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला दुहेरी मुकुट
उद्धव ठाकरे आजपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. कर्जमाफी तर दूरच पण मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदतही मिळाली नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. त्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. “पहिल्यांदाच उद्धव ठाकरे बाहेर पडल्याचा मला आनंद आहे, विकासावर त्यांचे एक भाषण दाखवा आणि हजार रुपये मिळवा,” असा टोलाही त्यांनी लगावला
राज ठाकरेंनी निवडणूक आयोगावर केलेल्या टीकेबद्दल फडणवीस म्हणाले, “त्यांना एकच उत्तर हवं आहे, ते म्हणजे निवडणुका पुढे ढकला. त्यांना दुसरे कोणतेही उत्तर अपेक्षित नाही. पण सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे निवडणुका पुढे जाऊ शकत नाहीत, त्यांना अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही.” सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे निवडणुका पुढे ढकलणे अशक्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.




