‘कराड, मलकापूरच्या विकासासाठी निधी देणार’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कराड : कराड व मलकापूर शहरे झोपडपट्टीमुक्त करू, या शहरांना प्रगत अन् वैशिष्ट्यपूर्ण साकारण्यासह सर्वत्या मुलभूत, नागरी सेवा- सुविधा तसेच सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधी देण्यास कमी पडणार नाही, तरी दोन तारखेच्या मतदानावेळी कमळाची चिंता करावी, पुढील पाच वर्षे आम्ही तुमच्या हिताची चिंता करण्यास कटिबध्द असल्याची ठाम ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
भाजपच्या कराड व मलकापूर नगरपालिका निवडणुकीतील उमेदवारांच्या जाहीर प्रचार सभेत कराडमध्ये ते बोलत होते. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष, आमदार अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे, माजी आमदार आनंदराव पाटील, कृष्णा साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, भरत पाटील, कराडच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार विनायक पावसकर व मलकापूरच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार तेजस सोनवणे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कराड, मलकापूरमधील भाजपचे सर्व उमेदवार सामान्य कुटुंबातील, जनतेचे प्रतिनिधी असल्याने निश्चित भरघोस मतांनी निवडून येतील असा ठाम विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी दिला. ते पुढे म्हणाले, यापूर्वीच्या राज्यकर्त्यांनी शहरांकडे दुर्लक्ष केल्याने शहरीकरण वाढत असताना, अनास्थेसह नागरी सुविधा तोकड्या पडल्या. झोपड्या, प्रदूषण, घनकचऱ्याची गंभीर समस्या, अतिक्रमणेही वाढली आणि शहरी समस्यांचा डोंगर झाला होता.
हेही वाचा – निवडणूक लांबणीवर; बारामती, अंबरनाथसह १० नगरपालिकांसाठी मतदान २० डिसेंबरला होणार
मात्र, केंद्रात नरेंद्र मोदींची सत्ता येताच सकल राष्ट्रीय उत्पन्नात ६५ टक्क्यांपर्यंतचा भाग उचलणाऱ्या शहरांच्या प्रगतीसाठी ठोस पावले उचलली गेली. अनेक योजना प्रभावीपणे राबवून, या शहरांना प्रगत व सुसज्ज बनवण्यासाठी व्यापक कार्यक्रम हाती घेण्यात आला आणि देशाच्या प्रगतीत हे महत्वाचे ठरल्याचे सांगताना मात्र, यापूर्वीच्या ६०-६५ वर्षातील राज्यकर्त्यांनी शहरीभागांकडे दुर्लक्ष केल्याने मोठे नुकसान झाले, प्रचंड समस्या उद्भवल्याची टीका फडणवीस यांनी केली.
डॉ. अतुल भोसले हे विकासाची व्यापकदृष्टी असलेले उमदे नेतृत्व असल्याने मी त्यांच्याकडे भविष्यातील मोठे नेतृत्व म्हणून पाहतो. त्यांच्या कामाचा झपाटा पाहता, आता हे नेतृत्व कोणालाही ऐकणार नाही म्हणून स्वपक्षियांसह मोठमोठ्या नेत्यांकडून या निवडणुकीत त्याना घेरण्याचे षडयंत्र आखले जात आहे. मात्र, आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत. चक्रव्यूह भेदण्याचे अन् त्यातून बाहेर पडण्याचे कसब आमच्याकडे असल्याचा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
डॉ. अतुल भोसले मागतात त्याला मी नाही म्हणत नाही, त्यांनी कराडच्या शिवाजी क्रीडांगण व अन्य विकासकामांसाठी भरघोस कोटींचा निधी मागितला, तो दिला. आता त्यांच्या अनेक योजना आहेत. ज्यांनी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला, त्या यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळ पुनर्विकासासाठी त्यांचा प्रस्ताव आहे. त्याला वाट्टेल एवढा देवू, पण, यशवंतराव चव्हाणांची समाधी झाल्यानंतर या ठिकाणच्या विकासाचा कोणी विचार केला नसल्याचा निशाणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर साधला. डॉ. अतुल भोसले यांचेही जोशपूर्ण भाषण झाले.




