निवडणूक लांबणीवर; बारामती, अंबरनाथसह १० नगरपालिकांसाठी मतदान २० डिसेंबरला होणार

मुंबई : आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांबाबत कायदेशीर पेच निर्माण झाला असतानाच, मंगळवारी मतदान होत असलेल्या नगरपालिका वा नगरपंचायतींमधील नगराध्यक्ष किंवा नगरसेवकपदाच्या ५०च्या आसपास ठिकाणची निवडणूक कायदेशीर मुद्द्यांवर पुढे ढकलण्याची नामुष्की राज्य निवडणूक आयोगावर आली आहे.
बारामती, अंबरनाथ, महाबळेश्वर, फलटणसह १० पालिकांमधील संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच स्थगित करण्यात आली. या सर्व पालिकांमध्ये आता २० डिसेंबरला मतदान होईल. पहिल्या टप्प्यात २४६ नगरपालिका आणि ४२ नगरंपचायती अशा एकूण २८८ पालिकांसाठी उद्या, मंगळवारी मतदान होणार आहे. पण कायदेशीर मुद्द्यांमुळे पेच निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मतदानासाठी ४८ तास शिल्लक असताना राज्य निवडणूक आयोगाला काही पालिकांमधील निवडणूक पुढे ढकलाव्या लागल्या.
नगराध्यपदासाठी कायदेशीर पेच निर्माण झालेल्या पालिकांची संपूर्ण निवडणूकच स्थगित करण्यात आली आहे. दहा नगरपालिकांमध्ये नगराध्यक्षपदाचा पेच असल्याने तेथील संपूर्ण निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली. अन्यत्र प्रभागनिहाय मतदान स्थगित झाले आहे. अंबरनाथ नगरपालिकेची संपूर्ण निवडणूकच रद्द झाली तर कुळगाव-बदलापूरमध्ये सहा प्रभागांना फटका बसला आहे.
प्रभागनिहाय स्थगित
- धाराशिव शहर : प्रभाग २ अ, ७ ब, १४ ब कुळगाव – बदलापूर नगरपालिका – प्रभाग क्र. ५ ब, प्रभाग १५ ब, प्रभाग १७ अ, प्रभाग क्र १० ब, प्रभाग ८ अ, प्रभाग १९ अ
- तळेगाव आणि लोणावळ्यातील प्रत्येकी ६, मावळमधील दोन नगर परिषदांची निवडणूक पुढे ढकलली. गडचांदूर नगर परिषद-प्रभाग क्र. ८ मूलनगर नगरपरिषद – प्रभाग क्र. १० ब
- गोंदिया नगर परिषद : प्रभाग क्र ३, ११ आणि १६ यवतमाळ जिल्ह्यातील- दिग्रस, पांढरकवडा आणि वणी येथील प्रभागांची निवडणूक लांबणीवर नांदेड – मुखेड, धर्माबाद , भोकर, कुंडलवाडी आणि लोहा येथील प्रत्येकी एका जागेवर
परिणाम कुठे?
- पुणे : बारामती
- अहिल्यानगर : कोपरगाव, देवळाली प्रवरा, नेवासा, पाथर्डी
- सातारा : महाबळेश्वर, फलटण
- ठाणे : अंबरनाथ नगरपालिका
- सोलापूर : मंगळवेढा नगरपरिषद
- अकोला : बाळापूर
- चंद्रपूर : घुग्गूस
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत : १० डिसेंबर (दुपारी ३ पर्यंत)
चिन्ह वाटप आणि उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करणे : ११ डिसेंबर
मतदान : २० डिसेंबर मतमोजणी : २१ डिसेंबर
नव्याने निवडणुकीचे वेळापत्रक : निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे : ४ डिसेंबर




