धावडेवस्ती- भगतवस्तीमध्ये भाजपा ‘राजेंद्र’ ठरणार की; विरोधकांचा ‘रवि’ तळपणार!
ग्राऊंड रिपोर्ट: प्रभाग क्रमांक ६ मध्ये गावकी-भावकी अन् प्रतिष्ठेची लढाई!

पिंपरी-चिंचवड । अविनाश आदक । पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 ची प्रारुप प्रभाग रचना जाहीर झाली. ऑक्टोबरमध्ये हरकती आणि सूचनांची सुनावणी होईल आणि सदरची प्रभाग रचना अंतिम केली जाणार आहे. त्यानंतर आरक्षण सोडत आणि निवडणूक आचारसंहिता सुरू होईल. ही निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडीतील घटकपक्ष स्वबळावर लढवतील, असे चित्र आहे. डिसेंबरमध्ये मतदान आणि जानेवारी-2026 मध्ये महानगरपालिकेत नवीन महापौर विराजमान होतील. या निमित्ताने ‘‘महाईन्यूज’’ च्या माध्यमातून प्रभागनिहाय राजकीय स्थितीबाबत विश्लेषण पहिला ‘‘ग्राऊंड रिपोर्ट’’ प्रसिद्ध करीत आहोत.
2017 च्या निवडणुकीप्रमाणे प्रभाग ‘‘रचना जैसे थे’’ आहे. प्रभाग क्रमांक 6 मध्ये कोणताही बदल नाही. ज्याअर्थी 2017 प्रमाणे प्रभाग निश्चित झाले आहेत. त्यासाठी 2011 ची जनगनना ग्रहीत धरण्यात आली आहे. तत्कालीन जनगननेनुसार, प्रभागाची लोकसंख्या 53 हजार 120 इतकी दर्शवण्यात आली आहे. त्यापैकी 4 हजार 700 इतकी अनुसूचित जाती आणि 1 हजार 800 इतकी अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे.
लोकसंख्येच्या प्रमाणानुसार, 2017 मध्ये शहरात भाजपाची मोठी लाट होती. या प्रभागातून भाजपाचे चारही नगरसेवक निवडून आले होते. प्रभागातील अ- गटातून भाजपाच्या यशोदा बोईनवाड यांनी 12 हजार 628 मते मिळवत, राष्ट्रवादीच्या आशा सुपे यांचा पराभव केला होता. ब- गटातून भाजपाच्या तिकीटावर लढलेल्या सारिका लांडगे यांनी 9 हजार 240 मते मिळवली होती. त्यांनी राष्ट्रवादीच्या सुनिता गवळी आणि शिवसेनेच्या करिष्मा बढे यांचा पराभव केला होता.
विद्यमान आमदार महेश लांडगे यांच्या त्यावेळी समर्थक असलेल्या सारिका लांडगे यांनी विधानसभा निवडणूक 2024 पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर विधानसभा निवडणूक 2024 मध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटात आणि त्यानंतर आता त्या राष्ट्रवादी अजित पवार गटात आहेत.
क- गटातून तत्कालीन भाजपाचे रवि लांडगे या प्रभागातून बिनविरोध निवडून आले होते. त्यावेळी राष्ट्रीय खेळाडू योगेश लांडगे यांनी माघार घेतली आणि रवि यांचा बिनविरोधचा मार्ग मोकळा झाला. मात्र, आमदार महेश लांडगे यांचे समर्थक असलेले रवि लांडगे यांनी स्थायी समिती सभापती संधी न दिल्यामुळे नंतरच्या काळात महेश लांडगेंच्या विरोधात भूमिका घेतली. भाजपा सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला.
महाविकास आघाडीच्या माध्यमातून विधानसभा निवडणूक 2024 मध्ये जोरदार तयारी केली. निवडणुकीपूर्वी त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. मात्र, महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये त्यांना संधी मिळाली नाही. विधानसभा निवडणुकीत त्यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटातून निवडणूक लढवलेले अजित गव्हाणे यांच्यासाठी रवि लांडगे यांनी प्रचार केला. मात्र, या निवडणुकीत महेश लांडगे यांनी बाजी मारली. रवि लांडगे आणि अजित गव्हाणे यांची एकत्र ताकद केली असतानाही, या प्रभागातून महेश लांडगे यांना सुमारे 7 हजार 500 हून मताधिक्य मिळाले.
प्रभागातील ड- गटातून आमदार महेश लांडगे यांचे समर्थक राजेंद्र लांडगे यांनी 9 हजार 819 मतांनी विजय मिळवला होता. त्यांनी अपक्ष लढलेले योगेश गवळी आणि शिवसेनेच्या तिकीटावर लढलेले विशाल लांडगे यांचा पराभव केला होता.
2017 च्या आरक्षणानुसार, अ- अनुसूचित जमाती- महिला, ब- नागरिकांचा मागास प्रवर्ग- महिला, क- सर्वसाधारण आणि ड- सर्वसाधारण असे आरक्षण होते. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला 50 टक्के आरक्षण आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, ओबीसी आरक्षण पूर्ववत ठेवण्यात आले आहे.
वास्तविक, शहरात अनुसूचित जमातीचे आरक्षण एकूण 5 प्रभागांत आहे. त्यापैकी 3 प्रभागात उमेदवारी दिली जाते. त्यामध्ये चक्राकार पद्धतीने आरक्षण निश्चित केले जाते. त्यामुळे या प्रभागतील अ-गटाचा अनुसूचित जमातीचे आरक्षण खुले होणार आहे. सदरची जागा ओबीसी किंवा सर्वसाधारण गटासाठी राहणार आहे.
भोसरी रुग्णालयाचे खासगीकरण आम्ही थांबवले. कोविड काळात हजारो नागरिकांनी याचा लाभ घेतला आहे. बहुउद्देशीय सभागृह आणि रुग्णालयाचे आरक्षण विकसित झाले. प्रभागातील नागरिकांच्या संपर्कात आहोत. सर्वच पक्ष स्वबळावर लढण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत. त्यामुळे विकासकामांच्या जोरावर आम्ही निवडणूक निश्चितपणे जिंकणार आहोत.
– रवि लांडगे, माजी नगरसेवक.
गेल्या 8 वर्षांमध्ये आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत. लोकांसोबत आमचे एक विश्वासाचे नाते निर्माण झाले आहे. रेड झोन आणि प्राधिकरण हद्दीत विखुरलेल्या प्रभागात आम्ही पायाभूत सोयी-सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला लोकांची साथ मिळेल आणि आमचे चारही नगरसेवक निवडून येतील.
– राजेंद्र लांडगे, भाजपा.