पोहायला गेला अन् घात झाला
खाणीत पोहण्यासाठी गेलेल्या चिखलीतील १७ वर्षीय मुलाचा मृत्यू

पिंपरी चिंचवड | मित्रांसोबत खाणीत पोहण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. मंगळवारी (दि. ९) दुपारी चिखली येथील शेलार वस्तीमधील खाणीतील पाण्यात त्याचा मृतदेह आढळून आला.
श्री मनोज चव्हाण (वय १७, रा. तळवडे) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. श्री हा सोमवारी दुपारी चार वाजता मित्रांसोबत चिखली येथील शेलार वस्तीमधील खाणीत पोहण्यासाठी गेला होता. त्यावेळी तो पाण्यात बुडाला. हा प्रकार पाहून त्याचे मित्र घाबरून तेथून निघून गेले. भितीपोटी त्यांनी याबाबत कोणालाही सांगितले नाही.
हेही वाचा : मोशी प्राधिकरण येथे ‘सिल्वराईज ग्रँड स्काय’ प्रकल्पाचे भूमिपूजन
दरम्यान, श्री याचा नातेवाईकांनी शोध सुरू केला असता मंगळवारी सकाळी मित्रांनी घटनेबाबत सांगितले. त्यावेळी चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दलाच्या जवानांनी दुपारी दीडच्या सुमारास श्री याचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.





