Karnataka Election Results 2023 : कर्नाटकचे मुख्यमंत्री कोण होणार?
कर्नाटकात काँग्रेसचं 'किंग',भाजपचा दारुण पराभव
Karnataka Election Results 2023 : कर्नाटक विधानसभेच्या २४४ मतदारसंघांसाठी १० मे रोजी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज पार पडली. कर्नाटकमध्ये भाजप पिछाडीवर आहे तर काँग्रेसने आघाडी घेतली आहे. यानुसार काँग्रेस बहुमताचं सरकार स्थापन करेल आणि यासह सलग एकाच पक्षाकडे सत्ता न देण्याची कर्नाटकातील ३८ वर्षे जुनी परंपरा कायम राहिली. या निकालाबद्दल देशभरात उत्सुकता पाहायला मिळत आहे.
कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं असून आता मुख्यमंत्री कोण होणार? याकडे संपुर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांना तातडीने दिल्लीला बोलावण्यात आलं आहे. डीके शिवकुमार आणि सिद्धारमय्या यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत असताना आता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचेही नाव चर्चेत आलं आहे.
हेही वाचा – किशोर आवारे हत्याप्रकरणात पोलिसांना सहकार्य करण्यास तयारः आमदार सुनील शेळके
निवडणुकीच्या आधी काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केला नव्हता. त्यामुळे या निवडणुका माजी मुख्यमंत्री सिद्धारमय्या आणि प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आल्या होत्या. त्यामुळे आता बहुमत आल्यानंतर या दोघांपैकीच कोणीतरी मुख्यमंत्री होणार अशी चर्चा होती. पण आता अचानक या शर्यतीमध्ये आता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे देखील स्पर्धेत आले आहेत. तसेच काँग्रेसचे जेष्ठ नेते जी परमेश्वर यांचं नावदेखील चर्चेत आहे.
दुसरीकडे बेळगाव जिल्ह्यातील यमकनमर्डी मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सतिश जारकीहोळी यांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे त्यांचंही नाव अनपेक्षितपणे पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मल्लिकार्जुन खरगे हे राष्ट्रीय अध्यक्ष असून ते काँग्रेस हायकमांडच्या मर्जीतले नेते आहेत. त्यामुळे त्यांनाही पसंती मिळू शकते.