संसदेवरील हल्ल्याच्या चौकशीची जबाबदारी ‘ईडी’, ‘इन्कम टॅक्स’कडे सोपवली काय? ठाकरे गटाचा हल्लाबोल
मुंबई : बुधवारी लोकसभेचं कामकाज सुरू असताना काही तरूणांनी संसदेत तसेच संसदेच्या बाहेर गोंधळ घातला. या घटनेमुळे लोकसभेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. या घुसखोरीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यावरून सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर हल्लाबोल करण्यात आला आहे.
सामनाच्या अग्रलेखात नेमकं काय म्हटलं?
मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देश महाशक्ती होत असल्याचे रोज सांगितले जाते, पण संसदेस महाशक्तीची मजबूत सुरक्षा व्यवस्था असताना ती भेदून दोन तरुण आत घुसतात व प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उडी मारून हाहाकार घडवतात, हे कसले लक्षण? लोकसभेचे अध्यक्ष बिर्ला म्हणतात, ‘सनसनाटी निर्माण करून प्रसिद्धी मिळविण्याचा हा प्रकार आहे. फार गांभीर्याने घेऊ नका’. बिर्लाजी, या तरुणांच्या हाती फक्त धुराची नळकांडी होती म्हणून बरे! २००१ प्रमाणे बॉम्ब, एके-47 असायला हवी होती काय? तरच तुम्हाला गांभीर्याने घ्यावे असा हा प्रकार वाटला असता काय?
हेही वाचा – ‘संसदेत घुसणाऱ्या तरूणांची शिक्षा सरकारने माफ करावी’; प्रकाश आंबेडकरांची मागणी
देशभरातील तरुणांत वैफल्य आहे व बेरोजगारांना रामलल्लाचे मोफत दर्शन घडवून हे वैफल्य दूर होणार नाही. महाराष्ट्रात गेल्या चार महिन्यांत तीन हजारांवर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आता अमोल शिंदेसारख्या तरुणानेही एक प्रकारे आत्मघातच केला. कारण सरकारने त्याला अतिरेकी ठरवून दहशतवादविरोधी कलमांखाली अटक केली. त्यामुळे आजन्म तुरुंगात राहणे चौघांच्या नशिबी आले.
लोकसभेत घुसखोरी करणाऱ्या दोघांनाही आत जाण्याचे ‘पास’ मिळाले ते भाजप खासदाराच्या शिफारसीने. त्यामुळे संपूर्ण भाजपच्या तोंडास याप्रकरणी टाळे लागले आहे. हाच खासदार विरोधी पक्षाचा असता व त्यातही मुसलमान असता तर भाजपने देशात एव्हाना ‘हिंदू खतरे में’ व ‘देश खतरे में’च्या डरकाळ्या फोडत २०२४च्या प्रचाराचा नारळ फोडून घेतला असता. पाच तरुणांतील कोणी मुसलमान असता तर ‘मोदी-शहां’ना मारण्याच्या इस्लामी राष्ट्रांच्या कटाचा शंख फुंकून देशातील माहौल गरम केला असता, पण ‘पास’ देणारा भाजपचा खासदार व घुसखोर हिंदू असल्याने कार्यक्रमास रंगत चढली नाही. आता या हल्ल्यामागेही पंडित नेहरू व काँग्रेसचे धोरण कारणीभूत आहे काय? कालच्या हल्ल्यास नेहरूच जबाबदार आहेत हे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत येऊन एकदा जाहीर करून टाकावे. या हल्ल्याच्या चौकशीची जबाबदारी ‘ईडी’, ‘इन्कम टॅक्स’च्या अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली आहे काय? असा खोचक सवाल केला आहे.